नाशिक: बालकांना न्याय मिळवून देणाऱ्या सपोर्ट पर्सन्सच्या कार्याचा ‘बेस्ट सपोर्ट पर्सन अवॉर्ड २०२५-२६’ने गौरव

नाशिक। दि. ३ ऑगस्ट २०२६: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांना न्याय प्रक्रिये दरम्यान संवेदनशील, प्रभावी व सातत्यपूर्ण सहकार्य करणाऱ्या सपोर्ट पर्सन्सच्या कार्याचा गौरव करण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, बाल कल्याण समिती आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘बेस्ट सपोर्ट पर्सन अवॉर्ड २०२५-२६’ वितरण समारंभ जिल्हा व सत्र न्यायालय, नाशिक येथील कॉन्फरन्स हॉलमध्ये संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल एन. रोकडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रधान न्यायाधीश, बाल न्याय मंडळ, नाशिक व्हि.डी.भराडे, जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री अमेटा, सतीष हिवाळे, जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी सुनील दुसाणे, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष ॲड मिलींद बाबर, बाल कल्याण समितीचे सदस्य गोपाळ शिंपी, ॲड पल्लवी घुगे, ॲड भगवान एलमामे, बाल न्याय मंडळाचे सदस्य गणेश कानवडे, शोभा पवार उपस्थित होते.

🔎 हे वाचलं का?:  व्यावसायिक सिलिंडर झाले 'इतक्या' रुपयांनी स्वस्त...

कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सपोर्ट पर्सन्सना ‘बेस्ट सपोर्ट पर्सन अवॉर्ड २०२५-२६’ प्रदान करून गौरविण्यात आले. यात सोनाली शहाणे यांनी प्रथम क्रमांक , गीतांजली पवार यांना द्वितीय, तर विजया शिंदे यांना तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच जिल्ह्यात कार्यरत सर्व सपोर्ट पर्सन्सच्या योगदानाचाही विशेष गौरव करण्यात आला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मतदार यादी अधिक अचूक व अद्ययावत करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन

महाराष्ट्रात प्रथमच नाशिक जिल्ह्यात अशा स्वरूपाचा ‘बेस्ट सपोर्ट पर्सन अवॉर्ड’ उपक्रम राबविण्यात आला. बाल कल्याण समितीचे अध्यक्ष अॅड. मिलिंद बाबर यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या उपक्रमाचे आयोजन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, बाल कल्याण समिती, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच विपला फाउंडेशन यांच्या संयुक्त सहकार्याने करण्यात आले.

मान्यवरांनी आपल्या मनोगतात पोस्को (POCSO) अधिनियम अंतर्गत पीडित बालकांना न्याय मिळवून देण्याच्या प्रक्रियेत सपोर्ट पर्सन्सची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. त्यांच्या संवेदनशील, समर्पित आणि प्रभावी कार्यामुळे बालकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ होत असल्याचे नमूद करत भविष्यातही अशा सेवाभावी कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्य करण्याचे आवाहन केले.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ-२०२७च्या विकासकामांना गती द्या; दर्जाशी तडजोड सहन केली जाणार नाही : मंत्री गिरीश महाजन

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी गुजर यांनी केले, तर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी समीरा येवले यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व सपोर्ट पर्सन्स, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे अधिकारी व कर्मचारी, विविध शासकीय विभागांचे अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790