Amazon

नाशिक: गंजमाळ परिसरात अवैध देशी दारू विक्रीवर गुन्हेशाखेची कारवाई; एकास अटक

नाशिक। दि. ३ ऑगस्ट २०२६: शहरातील गंजमाळ परिसरात सुरू असलेल्या अवैध देशी दारू विक्रीवर गुन्हेशाखा युनिट-१च्या पथकाने धाड टाकून एका व्यक्तीस अटक केली. या कारवाईत १३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (२ ऑगस्ट) गुन्हेशाखा युनिट-१चे पोलीस हवालदार प्रशांत मरकड आणि विशाल काठे यांना गुप्त माहिती मिळाली होती की, भीमवाडी, गंजमाळ परिसरात एक व्यक्ती विनापरवाना अवैधरित्या देशी दारूची विक्री करत आहे. ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांना देण्यात आल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने परिसरात छापा टाकला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: प्रशासनात नावीन्यपूर्ण उपक्रम राबवा, कामाचे प्रभावी दस्तऐवजीकरण करा : आयुष प्रसाद

कारवाईदरम्यान भीमवाडी झोपडपट्टी परिसरात एक व्यक्ती खाकी रंगाच्या बॉक्समधून तसेच पांढऱ्या प्लास्टिकच्या पिशवीतून देशी दारूच्या बाटल्यांची विक्री करत असल्याचे निदर्शनास आले. पथकाने त्याला ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव मनोहर चिंतामण भोये (वय ४५, रा. भीमवाडी, गंजमाळ, नाशिक) असे आहे. त्याच्या ताब्यातून देशी दारूचा साठा आणि अन्य साहित्य असा एकूण १३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळा: रामकुंड परिसरातील कामे ३ आठवड्यात पूर्ण करण्याचे निर्देश

या प्रकरणी पोलीस हवालदार विशाल काठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790