नाशिक: पोक्सो प्रकरणात सहआरोपी करण्याची धमकी; पोलिस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

नाशिक। दि. २ ऑगस्ट २०२६: पोक्सो प्रकरणात आरोपी असलेल्या मुलाच्या आई-वडिलांनाही गुन्ह्यात सहसंशयित करण्याची भीती दाखवत लाचेची मागणी केल्याप्रकरणी सुरगाणा पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक चंद्रकांत दवंगे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ताब्यात घेतले. या प्रकरणात २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्यांचा खासगी मध्यस्थ इब्राहिम करीम वाणी (वय २८, रा. जामुनमाथा) याला एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक तहसील कार्यालयातर्फे जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या मुलाविरुद्ध सुरगाणा पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल असून तो सध्या नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. या गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक दवंगे यांच्याकडे होता.

तपासादरम्यान १९ जून रोजी दवंगे यांनी आरोपीच्या आई-वडिलांना पोलिस ठाण्यात बोलावून दिवसभर बसवून ठेवले. त्यानंतर त्यांनाही या गुन्ह्यात सहसंशयित न करण्याच्या मोबदल्यात ५० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: तांत्रिक सल्लागार समितीकडून नाशिकमधील कुंभस्थळांची पाहणी

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचेची रक्कम ५० हजारांवरून २० हजार रुपयांवर ठरल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार एसीबीने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने एका किराणा दुकानात काम करणाऱ्या खासगी व्यक्ती इब्राहिम करीम वाणी याच्याकडे पंचांसमक्ष २० हजार रुपयांची रक्कम दिली. लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने वाणीला रंगेहात पकडले. त्यानंतर उपनिरीक्षक चंद्रकांत दवंगे यांनाही ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ-२०२७च्या विकासकामांना गती द्या; दर्जाशी तडजोड सहन केली जाणार नाही : मंत्री गिरीश महाजन

सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक योगेश शिंदे, पोलीस हवालदार गणेश निंबाळकर, अंमलदार नितीन नेटारे, आणि समीर शेख यांच्या पथकाने केली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790