नाशिक: APK फाईल डाऊनलोड करताच व्यावसायिकाची १.६९ लाखांची ऑनलाइन फसवणूक

नाशिक। १ ऑगस्ट २०२६: मोबाईलवर आलेली अनोळखी एपीके (APK) फाईल डाऊनलोड करणे एका व्यावसायिकाला चांगलेच महागात पडले. सायबर गुन्हेगारांनी या फाईलच्या माध्यमातून मोबाईलवर नियंत्रण मिळवत संबंधिताच्या बँक खात्यातून तब्बल १ लाख ६९ हजार रुपये ऑनलाइन लंपास केल्याची घटना पुणे रोड परिसरात घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिकाला २६ जून रोजी ‘जोशी’ नावाच्या व्यक्तीचा फोन आला. संबंधिताने स्वतःला अॅटम टेक्नॉलॉजी कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे सांगत कंपनीसाठी वस्तू खरेदी करायच्या असल्याची माहिती दिली. त्यानंतर कंपनीची माहिती भरण्यासाठी मोबाईलवर एपीके फाईल पाठवण्यात आली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक तहसील कार्यालयातर्फे जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव

व्यावसायिकाने ती फाईल डाऊनलोड करून त्यामधील माहिती भरल्यानंतर सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या मोबाईलचा तसेच बँक खात्याचा अॅक्सेस मिळवला. त्यानंतर त्यांच्या खात्यातून १.६९ लाख रुपये ऑनलाइन व्यवहाराद्वारे परस्पर वर्ग करण्यात आले. बँक खात्यातून रक्कम वळती झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: किरकोळ वादातून कुऱ्हाडीने हल्ला; आरोपीला ७ वर्षांची सक्तमजुरी

एपीके फाईलद्वारे फसवणूक कशी केली जाते?

एपीके (APK) ही अँड्रॉइड मोबाईलमध्ये अॅप इन्स्टॉल करण्यासाठी वापरली जाणारी फाईल असते. सायबर गुन्हेगार बँक अपडेट, वीजबिल भरणे, कुरिअर ट्रॅकिंग, केवायसी अपडेट, लॉटरी किंवा नोकरीच्या आमिषाने एसएमएस, व्हॉट्सअॅप किंवा टेलिग्रामद्वारे अशा फाईल्स पाठवतात. वापरकर्त्याने ती फाईल इन्स्टॉल करताच त्यामधील मालवेअर मोबाईलवरील नियंत्रण हॅकर्सकडे पोहोचवते. त्यानंतर बँकिंग माहिती, ओटीपी, संदेश आणि इतर संवेदनशील माहितीचा गैरवापर करून आर्थिक फसवणूक केली जाते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: साधुग्राममधील प्रत्येक सुविधा भाविकांच्या सुरक्षिततेला पूरक ठरावी- विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

नागरिकांनी घ्यावयाची काळजी

  • अनोळखी व्यक्तीकडून आलेली APK फाईल किंवा लिंक डाऊनलोड करू नका.
  • मोबाईलमधील ‘Unknown Sources’ पर्याय बंद ठेवा.
  • अॅप्स केवळ Google Play Store किंवा Apple App Store वरूनच इन्स्टॉल करा.
  • कोणालाही ओटीपी, पिन किंवा बँकिंग माहिती देऊ नका.
  • अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून कोणतीही फाईल किंवा अॅप इन्स्टॉल करण्यापूर्वी खातरजमा करा.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790