नाशिक: भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील बहिणीचा जागीच मृत्यू; भाऊ गंभीर जखमी

नाशिक। दि. २९ जुलै २०२६: मुंबई-आग्रा महामार्गावरील श्री बळी महाराज चौक उड्डाणपुलावर भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ५३ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू, तर तिचा भाऊ गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी (दि. २७) रात्री घडली असून, पंचवटी पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गंगापूर धरणाचा विसर्ग ८,१६० क्युसेकवर; बुधवारपासून तीन दिवस ‘यलो अलर्ट’

या अपघातात उषा सोमनाथ चाटोटे (वय ५३, रा. भोईराज सदन, चुंचाळे शिवार, अंबड) यांचा मृत्यू झाला. तर दीपक विश्वनाथ मोरे (वय ४३, रा. विधाते गल्ली, सातपूर) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उषा चाटोटे आणि दीपक मोरे हे भाऊ-बहिण कामानिमित्त मालेगाव येथे गेले होते. तेथील काम आटोपून ते दुचाकीने (एमएच ४१ यू ४४२५) नाशिककडे परतत असताना रात्री सुमारे ९.१५ वाजता श्री बळी महाराज चौकातील उड्डाणपुलावर अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 11 दिवस ‘डिजिटल अरेस्ट’; निवृत्त अभियंत्याची 59.58 लाखांची सायबर फसवणूक

धडकेनंतर दोघेही रस्त्यावर फेकले गेले. त्याचवेळी मागून येणाऱ्या जड वाहनाचे चाक उषा चाटोटे यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दीपक मोरे यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पंचवटी पोलिस करत असून, अपघातानंतर पसार झालेल्या अज्ञात वाहनाचा शोध सुरू आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790