कर्जमंजुरीचे आमिष दाखवत कोट्यवधींची फसवणूक; मुख्य आरोपी महिला अटकेत

नाशिक | ९ जुलै २०२६: महिलांना मोठ्या रकमेचे व्यावसायिक कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवत कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी फरार असलेल्या मुख्य आरोपी महिलेला अंबड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-३ ने मखमलाबाद परिसरातून अटक केली. सई राजेंद्र बोडके (वय ४५) असे अटक करण्यात आलेल्या संशयित महिलेचे नाव असून न्यायालयाने तिला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: लग्नासाठी अघोरी पूजा ! अर्ध्या रात्री स्मशानात नेले, महिलेची ७७ हजारांची फसवणूक

अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगवेंद्रसिंह राजपूत यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिडको येथील वीर सावरकर चौक परिसरातील रहिवासी संगीता प्रशांत झिटे यांनी १९ जून २०२६ रोजी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार, सई बोडके, तिचा पती राजेंद्र बोडके आणि विनोद दौड यांनी ओम साई बचतगटातून अरिहंत मायको फायनान्स, चेन्नई’ तर्फे महिलांना व्यवसायासाठी १ कोटी २० लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून देण्याचे आश्वासन दिले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासह अत्याधुनिक सुविधा देण्यास कटिबद्ध- मंत्री प्रकाश आबिटकर

यासाठी फिर्यादीकडून वेळोवेळी ऑनलाइन आणि रोख स्वरूपात १८ लाख ५३ हजार रुपये, तसेच चार तोळे सोन्याचे दागिने स्वीकारण्यात आले. मात्र, कर्ज मंजूर न करता संबंधित रक्कम आणि दागिने परत न केल्याने फसवणूक झाल्याचे उघडकीस आले.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात, याच पद्धतीने इतर अनेक महिलांचीही फसवणूक करण्यात आल्याचा संशय असून, या प्रकरणातील एकूण आर्थिक व्यवहार सुमारे चार कोटी रुपयांपर्यंत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: भद्रकाली मंदिरातील सिंहाची मूर्ती चोरीला; तासाभरात दोघे ताब्यात

गुन्हा दाखल झाल्यानंतर मुख्य आरोपी फरार होती. दरम्यान, ७ जुलै रोजी ती मखमलाबाद येथील गामणे मळा परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून तिला ताब्यात घेतले.

या प्रकरणातील अन्य आरोपींचा शोध सुरू असून, फसवणुकीची व्याप्ती आणि आर्थिक व्यवहारांचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790