राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा, नाशिकलाही दिलासा

मुंबई/नाशिक। दि. २ जुलै २०२६: जून महिन्यात काही काळ संथावलेला नैऋत्य मान्सून आता पुन्हा सक्रिय झाला असून महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसाने जोर धरला आहे. गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणातील अनेक भागांत चांगल्या पावसाची नोंद झाली. त्यामुळे पावसाअभावी रखडलेल्या पेरण्यांना गती मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

यंदा जूनच्या सुरुवातीलाच राज्यात दाखल झालेला मान्सून काही दिवसांनंतर मंदावला होता. त्यामुळे अनेक भागांत अपेक्षित पाऊस झाला नव्हता. मात्र आता वातावरणात अनुकूल बदल झाल्याने मान्सूनने पुन्हा वेग घेतला असून राज्यभर पावसाची तीव्रता वाढत आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहरातील 'या' भागांत मंगळवारी (दि. २५) वीजपुरवठा बंद राहणार !

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २ ते ७ जुलैदरम्यान मध्य महाराष्ट्र आणि कोकणात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. नाशिकसह मराठवाड्यात २ आणि ३ जुलै रोजी बहुतांश भागांत पावसाचा जोर राहण्याचा अंदाज आहे. विदर्भात २ ते ४ जुलै तसेच ७ जुलै रोजी पावसासाठी अनुकूल परिस्थिती राहणार असून, पुढील पाच दिवस राज्यातील विविध भागांत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, बुधवारी नाशिक शहरात दिवसभरात ६.५ मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील अनेक भागांत दिवसभर ढगाळ वातावरण कायम होते. शहरात सकाळपासून दुपारपर्यंत पावसाळी वातावरण टिकून राहिले. नाशिकरोड, पाथर्डी, अंबड, सीबीएस परिसर तसेच मध्यवर्ती भागात दुपारपर्यंत मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या सरी कोसळल्या.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक; गुन्हे शाखा युनिट-२ची कारवाई

जुलै महिन्यात हवामानाचा बदलता अंदाज

हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, जुलै महिन्यात महाराष्ट्रात उष्णतेची तीव्रता कमी राहण्याची शक्यता आहे. महिन्याच्या सुरुवातीला वातावरणात गारवा जाणवेल, तर दुसऱ्या आठवड्यात पावसाचा जोर लक्षणीय वाढू शकतो. या कालावधीत सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमानाची शक्यता असून रात्रीच्या तापमानातही घट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

आठवड्यानुसार संभाव्य परिस्थिती

  • पहिला आठवडा: कोकणात दररोज सुमारे १० ते २० मिमी, तर उर्वरित महाराष्ट्रात ५ ते १० मिमी पावसाची शक्यता.
  • दुसरा आठवडा: पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. अनेक भागांत दररोज २० ते ४० मिमीपर्यंत पर्जन्य होऊ शकतो.
  • तिसरा आठवडा: राज्यातील बहुतांश भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस कायम राहण्याचा अंदाज.
  • चौथा आठवडा: पावसाची तीव्रता कमी होऊन अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता.
🔎 हे वाचलं का?:  नाशिक: २८ ते ३० ऑगस्ट सिंहस्थ 'महाकुंभ भक्ती संगम'चे आयोजन

एकूणच, जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यात मान्सून अधिक सक्रिय राहण्याची शक्यता असून कृषी क्षेत्रासह जलसाठ्यांसाठीही हा पाऊस दिलासादायक ठरण्याची अपेक्षा आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790