मोठी बातमी! ‘टीईटी’चा पेपर फुटला, रविवारी (दि. २८) होणारी TET ची परीक्षा रद्द

मुंबई। दि.२७ जून २०२६: राज्यात रविवारी (दि. २८ जून) आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२६ ऐनवेळी पुढे ढकलण्यात आली आहे. भिवंडी येथे परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा संशय निर्माण झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने हा महत्त्वाचा निर्णय घेतला. पारदर्शक आणि निष्पक्ष परीक्षा प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी परीक्षा स्थगित करण्यात आल्याचे परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

पहाटेच्या कारवाईत संशयास्पद साहित्य जप्त:
शनिवार (दि. २७ जून) पहाटे भिवंडी पोलिसांना गुप्त माहितीच्या आधारे काही व्यक्तींकडे टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेशी संबंधित साहित्य असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने छापा टाकून संशयास्पद साहित्य जप्त केले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: २८ ते ३० ऑगस्ट सिंहस्थ 'महाकुंभ भक्ती संगम'चे आयोजन

मूळ प्रश्नपत्रिकेशी प्रश्न जुळल्याचा दावा:
कारवाईनंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या साहित्याची मूळ प्रश्नपत्रिकेशी पडताळणी करण्यात आली असता काही प्रश्न प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांशी जुळत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. त्यानंतर भिवंडी पोलिसांनी संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

पारदर्शकतेसाठी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय:
यंदाची शिक्षक पात्रता परीक्षा राज्यभरातील १,०२८ परीक्षा केंद्रांवर होणार होती. यापूर्वी विविध स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थाही कडक करण्यात आली होती. मात्र परीक्षेच्या आदल्या दिवशीच हा प्रकार उघडकीस आल्याने परीक्षा परिषदेला संपूर्ण परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा लागला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: जप्त गौण खनिजांचा जाहीर लिलाव आता १ सप्टेंबरला; तारखेत बदल

परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात, “परीक्षा पूर्णपणे पारदर्शक आणि विश्वासार्ह पद्धतीने पार पडणे हेच परिषदेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याने २८ जून रोजी नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे,” असे म्हटले आहे.

नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर होणार:
परीक्षा पुढे ढकलल्यामुळे राज्यभरातील लाखो उमेदवारांना मोठा धक्का बसला आहे. परीक्षेची सुधारित तारीख आणि पुढील सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. उमेदवारांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सिंहस्थासाठी साधुग्राम, मंडप व्यवस्थेचा आढावा; २०१५च्या कुंभमेळ्यातील अनुभवाचा नियोजनात उपयोग

प्रामाणिक उमेदवारांना न्याय मिळावा : डॉ. माधव सूर्यवंशी:
या घटनेवर प्रतिक्रिया देताना शिक्षण विकास मंचचे मुख्य समन्वयक डॉ. माधव सूर्यवंशी यांनी सांगितले की, कथित पेपरफुटीमुळे हजारो प्रामाणिक शिक्षक उमेदवारांच्या अनेक महिन्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे. दोषींवर कठोर कारवाई करून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी तसेच पात्र उमेदवारांचे नुकसान टाळण्यासाठी नव्या परीक्षेची तारीख तातडीने जाहीर करावी. प्रामाणिक उमेदवारांना न्याय मिळवून देणे ही शासन आणि प्रशासनाची नैतिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790