नाशिक। दि. २४ जून २०२६: शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक ज्या मान्सूनच्या प्रतीक्षेत होते, त्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अखेर मंगळवारी (दि. २३) राज्यात जोरदार हजेरी लावली. नाशिकसह मुंबई, ठाणे, पालघर आणि मराठवाड्यातील अनेक भागांत पावसाने दमदार पुनरागमन करत अवघ्या २४ तासांत महाराष्ट्राच्या सुमारे ७५ टक्के भूभागावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
मंगळवारी सकाळपासूनच नाशिक जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. सकाळी साडेअकराच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. दुपारच्या सुमारास काही काळ विश्रांती घेतल्यानंतर सायंकाळी पुन्हा पावसाचा जोर वाढला. नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सिन्नर आणि निफाड तालुक्यांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या सरी कोसळल्या.
नाशिक शहरात दुपारी १२ ते सायंकाळी ६ या सहा तासांच्या कालावधीत तब्बल २० मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. जिल्ह्यातील विविध भागांमध्ये झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
दरम्यान, संभाजीनगर जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली. तर यवतमाळ जिल्ह्यात वीज कोसळल्याने तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
हवामान विभागाने पुढील चार दिवस नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, सांगली तसेच मराठवाड्यातील काही भागांसाठी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांचा इशारा दिला आहे. नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
![]()


