नाशिकमध्ये RTOची धडक मोहीम; ४३ हजार वाहनचालकांवर कारवाई

नाशिक। दि. २८ एप्रिल २०२६: प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिक यांच्या वायुवेग पथकांकडून शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध सातत्याने मोहीम राबवली जात असून विविध प्रकारच्या नियमभंगांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे.

RTOकडून दिलेल्या माहितीनुसार, अतिवेगाने वाहन चालविणे, ओव्हरलोड वाहतूक, विनाहेल्मेट दुचाकी चालविणे, योग्यता प्रमाणपत्र नसलेली वाहने, तसेच अवैध प्रवासी वाहतूक यांसारख्या प्रकारांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: तांत्रिक सल्लागार समितीकडून नाशिकमधील कुंभस्थळांची पाहणी

या कारवाईदरम्यान विनाहेल्मेट वाहन चालविणाऱ्या तब्बल १०,९६३ वाहनधारकांवर दंड ठोठावण्यात आला. याशिवाय जादा भार वाहतूक करणाऱ्या २,७८८ वाहनांवर, योग्यता प्रमाणपत्र नसलेल्या ४,८०३ वाहनांवर, तसेच रिफ्लेक्टिव्ह टेप, टेल लाईट किंवा ब्रेक लाईट नसलेल्या २,५५३ वाहनांवरही कारवाई करण्यात आली.

तसेच अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या ३,७८८ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, विना परवाना वाहन चालविणाऱ्या ९७ अल्पवयीन विद्यार्थी चालकांवरही गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या १३८ चालकांवर कारवाई करण्यात आली असून, डोळे दिपवणारे हेडलाईट असलेल्या २०२ वाहनांवरही दंडात्मक उपाययोजना करण्यात आल्या.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: किरकोळ वादातून कुऱ्हाडीने हल्ला; आरोपीला ७ वर्षांची सक्तमजुरी

याशिवाय ओव्हरसाईज मालवाहतूक (ODC) करणाऱ्या ३९० वाहनांवर आणि स्पीड गव्हर्नर नसलेल्या ८८७ वाहनांवरही कारवाई करण्यात आली आहे.

गतवर्षभरात RTO नाशिकच्या वायुवेग पथकांनी एकूण ४३,७८९ वाहनांवर कारवाई करत १२ कोटी १ लाख ७० हजार ६६३ रुपयांचा दंड वसूल केला आहे.

वाहतूक नियमांचे पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून नियमभंग केल्यास मोटार वाहन कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिक यांनी दिला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790