नाशिक, दि. ३१ जानेवारी २०२६: आगामी नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर ध्वजस्तंभ व पताका यांच्या रचना व उभारणीबाबत आढावा व नियोजन बैठक नुकतीच स्मार्ट सिटी मिशन कार्यालय, नाशिक येथे पार पडली.
ही बैठक नाशिक–त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्याच्या काळात उभारण्यात येणाऱ्या ध्वजस्तंभ व पताकांच्या नियोजन, स्थापत्य रचना, साहित्य निवड, उंचीचे निकष, धार्मिक व सांस्कृतिक प्रतीकात्मकता तसेच कामकाजाचे नियोजन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
ध्वजस्तंभ हे केवळ भौतिक संरचना नसून श्रद्धा, सांस्कृतिक वारसा व सामाजिक एकतेचे प्रतीक असल्याने त्यांची रचना व उभारणी अत्यंत संवेदनशीलतेने व जबाबदारीने करण्यात यावी, असे यावेळी अधोरेखित करण्यात आले. नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे एकसमान रचना राहील यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करण्याचे निर्देश देण्यात आले.
सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रस्तावित नियोजन व रचनेबाबत सविस्तर सादरीकरण केले. ध्वजस्तंभ मजबूत व टिकाऊ पायाभरणीसह उभारण्यात येणार असून कोणत्याही प्रकारचे संरचनात्मक नुकसान होऊ नये याची काळजी घेतली जाणार आहे. कुंभमेळ्याच्या पौराणिक महत्त्वाशी निगडित प्रतीकात्मक कोरीव काम, विशेषतः समुद्रमंथनाशी संबंधित संदर्भ, ध्वजस्तंभांवर समाविष्ट करण्यात येणार आहेत.
बैठकीत ध्वजस्तंभांची उंची ५१ फूट व ३१ फूट अशी असणार असून त्यांची पायाभरणी अनुक्रमे १ फूट व ८ इंच त्रिज्येची असेल. ध्वजस्तंभाचा पाया साधा ठेवण्यात येईल, तर सजावटीचे व प्रतीकात्मक काम स्तंभावर करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.
नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील पुरोहित संघांनी ध्वजस्तंभांसाठी आध्यात्मिक व धार्मिक रचनात्मक घटक सादर केले. हे घटक स्थापत्य रचनेत समाविष्ट करण्यात येणार असून सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन्ही पुरोहित संघांशी चर्चा करून अंतिम आराखडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच, पताकांची रचना संबंधित पुरोहित संघांकडूनच करण्यात येईल, असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
बैठकीचा समारोप करताना सर्व संबंधित विभागांना धार्मिक पावित्र्य, सांस्कृतिक महत्त्व व दीर्घकालीन उपयोगिता लक्षात घेऊन जबाबदाऱ्या वेळेत व समन्वयाने पार पाडण्याचे निर्देश देण्यात आले.
या बैठकीस नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री, शहर अभियंता संजय अग्रवाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल के. पाटील, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता स्नेहल पगारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अविनाश डी. देवरे, सहाय्यक अभियंता अमोल अरुण कोर्डे, नाशिक महानगरपालिकेचे उपअभियंता समीर रकाटे, नगररचना विभागाचे उपअभियंता ए. बी. राऊत, कलाकार व शिल्पकार प्रमोद कांबळे, पुरोहित संघ नाशिकचे अध्यक्ष चंद्रशेखर पांचाक्षरी, रामानंदाचार्य दक्षिण पीठाचे सचिव प्रविण बी. ठाकूर, गंगा गोदावरी पुरोहित संघाचे उपाध्यक्ष दिलीप शुक्ला, पुरोहित संघ त्र्यंबकेश्वरचे अध्यक्ष मनोज एन. जेते, सचिव श्रीपाद अकोलकर व खजिनदार सुयोग एस. देवकुटे आदी उपस्थित होते.
![]()


