नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील कॅनडा कॉर्नर परिसरात दिवसाढवळ्या चोरट्यांनी कारची काच फोडून दोन लाख रुपये रोकड लंपास केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रसाद सोनार (रा.पाथर्डी फाटा) हे नेहमीप्रमाणे बुधवारी (दि.२१) रोजी सकाळी १० च्या सुमारास सोनार त्यांच्या मोबाईल शॉपीवर आले. त्यांनी आपली चारचाकी दुकानाजवळ उभी केली. तसेच बँकेत भरणा करण्यासाठी आणलेली दोन लाखाची रोकड असलेली बॅग कारमध्येच ठेवून कार लॉक करून ते दुकानात गेले. दुपारी २ वाजेच्या सुमारास ते बँकेत जाण्यासाठी कारजवळ आले. मात्र, त्यांना कारच्या खिडकीची काच फुटलेली दिसली. म्हणून त्यांनी कारमध्ये ठेवलेली रोकड असलेली बॅग तपासली. मात्र, ती आढळून आली नाही.
म्हणून याबाबत सोनार यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक हेमंत सोमवंशी पथकासह घटनास्थळी पोहोचले. यासंदर्भात जवळचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्याचे आदेश पोलिस निरीक्षक सोमवंशी यांनी कर्मचाऱ्यांना दिले. फिर्यादीनुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.