नाशिक (प्रतिनिधी) : अनलॉक अंतर्गत परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे तब्बल ६ महिने बंद असलेली नाशिक शहरातील शहर बससेवा अखेर गुरुवरी (दि.२२ ऑक्टोबर) म्हणजेच आजपासून सुरु करण्यात आली आहे. शहरातील मुख्य ६ मार्गांवरून रोज प्रत्येकी २० फेऱ्या मारण्याचे नियोजन केले असून, या मार्गावरील उत्पन्न लक्ष्यात घेऊन बसेसची संख्या देखील वाढविण्यात येईल असे निर्देश महामंडळाकडून देण्यात आले आहेत.
शहरबस सेवा बंद असल्यामुळे वैयक्तिक वाहन नसलेल्या नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. तर दुसऱ्या बाजूला संपूर्ण राज्यात बससेवा सुरू झाली होती. परंतु, नाशिक शहर बससेवा बंद होती. कारण बससेवा सुरू करण्यासाठी तोटा आणि अन्य कारणे महामंडळाकडून पुढे करण्यात येत होती. मात्र, महामंडळाने बेस्टच्या मदतीला धाव घेतल्याने प्रश्नचिन्ह उभा झाला होता. त्यामुळे महामंडळावर सर्व बाजूने आक्षेप घेतला जात होता. या सर्व पार्श्वभूमीवर महामंडळाने तातडीने बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, निमाणी ते नाशिकरोड, निमाणी ते श्रमिकनगर, निमाणी ते उत्तमनगर, निमाणी ते अंबड, निमाणी ते विजयनगर व निमाणी ते पाथर्डी गाव या मार्गांवर आजपासून शहर बसेस धावतांना दिसतील.