नाशिक। दि. १३ जानेवारी २०२६: जिल्हा प्रशासनामार्फत 22 व 23 जानेवारी 2026 रोजी गंगापूर धरण परिसरात सूर्यकिरण एअर शो चे आयोजन केले आहे. या एअर शो च्या आयोजनात गंगापूर धरण परिसरातील खासगी व्यावसायिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन पर्यटन विभागाचे उपसंचालक डॉ. नंदकुमार राऊत यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
येत्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरात असा एअर शो प्रथमच होत आहे. या एअर शो चा आनंद घेण्यासाठी गंगापूर धरण परिसरात जिल्हा प्रशासनामार्फत शासकीय जागेवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नाशिक एअर शो मध्ये भारतीय वायु सेनेमार्फत चित्तथरारक साहसी उपक्रमांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे.
धरण परिसरातील खासगी रिसॉर्ट, कृषी पर्यटन केंद्र, होम स्टे, निवास व न्याहरी योजनाधारक व इतर इच्छुकांनी नाशिक एअर शो बघण्यासाठी पर्यटकांना सोयी उपलब्ध करून द्याव्यात. नाशिक एअर शो पाहण्यासाठी बैठक व्यवस्था, खानपान सुविधा, वाहनतळ व्यवस्था इतर सोयी पर्यटकांना उपलब्ध करून परिसरातील व्यावसायिकांना रोजगाराची उत्तम संधी मिळणार आहे तसेच यामुळे मोठ्या प्रमाणावर यशस्वीरित्या या कार्यक्रमाचे आयोजन करणे शक्य होणार आहे.
नाशिक एअर शो बघणेसाठी बैठक व पार्कींग व्यवस्था करणेसाठी जिल्हा प्रशासनाच्या परवानगीची आवश्यकता नाही. फक्त गर्दी नियंत्रणासाठी स्थानिक पोलीसांकडून ना हरकत प्रमाणपत्र घेवून खासगी व्यवसायिक पर्यटकांना नाशिक एअर शो बघण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देवू शकतात. असेही उपसंचालक श्री राऊत यांनी कळविले आहे.
![]()


