नाशिक। दि. २९ डिसेंबर २०२५: मालेगाव महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे तत्कालीन प्रशासनाधिकारी तथा सध्या धुळे येथील जिल्हा परिषद प्राथमिकचे उपशिक्षणाधिकारी संशयित चंद्रकांत दौलत पाटील (वय ४१, रा. धुळे) यांच्याविरुद्ध दोन लाख रुपयांची लाचेची मागणी करत ती स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पवारवाडी पोलिस ठाण्यात (मालेगाव) रविवारी (दि. २८) गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार शिक्षक जेव्हा नोकरीला लागले तेव्हा जुनी शासकीय पेन्शन योजना बंद झाली होती. उच्च न्यायालय नागपूरच्या खंडपीठाने २००५ सालापूर्वी योजना लागू करण्याबाबत निर्णय दिला होता. राज्य शासनाने जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबतचा अध्यादेश काढलेला आहे. योजना लागू करण्याबाबत तक्रारदार यांनी पाटील यांच्याकडे मालेगाव शिक्षण विभागाकडे २१ फेब्रुवारी २०२४ साली अर्ज दिला होता.
योजना सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करून मालेगाव मनपा आयुक्तांकडे सादर करण्याच्या मोबदल्यात पाटील यांनी प्रति शिक्षक याप्रमाणे प्रत्येकी १० हजार रुपयेप्रमाणे दोन लाखांची मागणी केली होती. पोलिस अधीक्षक भारत तांगडे यांनी दिलेल्या आदेशानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. पंच, साक्षीदार यांच्यासमक्ष तक्रारदाराकडे दोन लाखांची मागणी स्वीकारण्याची तयारी दर्शविली अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली आहे. आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून अटकेची तजवीज ठेवण्यात आली आहे.
पाटील यांच्यावर २८ डिसेंबर २०२५ रोजी पवारवाडी पोलीस स्टेशन, मालेगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उप अधीक्षक सुरेश शिरसाठ, हवालदार विनोद चौधरी, दीपक पवार व नितीन नंतर यांच्या पथकाने केली.
![]()

