नाशिक: धोकादायकरीत्या उभ्या ट्रकला कारची धडक; तीन वर्षांच्या चिमुकलीसह चौघे जखमी

नाशिक। दि. २९ डिसेंबर २०२५: महामार्गावर रस्त्याच्या कडेला असुरक्षितपणे उभ्या करण्यात आलेल्या ट्रकला कार धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात तीन वर्षांच्या चिमुकलीसह कारमधील चौघे जण जखमी झाले. हा अपघात नाशिक–मुंबई महामार्गावरील नववा मैल परिसरात घडला असून, याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जेलरोड परिसरातील उमेश मुळे यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. उपेंद्र गवळी, त्यांची पत्नी रेश्मा, मुलगी मोहिनी (वय ८) आणि चैताली (वय ३) यांच्यासह देवदर्शन आटोपून कारमधून नाशिककडे येत असताना नववा मैल येथील अमृत पंजाब ढाब्यासमोर महामार्गावर ट्रक (क्रमांक एमएच १८ बीजी ८९६८) पार्किंग लाईट न लावता अंधारात धोकादायकरीत्या उभा करण्यात आला होता.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: आखाड्यांना लवकरच मुलभूत सोईसुविधा उपलब्ध करून देणार- आयुक्त शेखर सिंह

अचानक समोर उभा असलेला ट्रक न दिसल्याने कार ट्रकच्या मागील भागावर आदळली. या धडकेत कारच्या पुढील सीटवर बसलेल्या चैताली हिच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत होऊन हाड फ्रॅक्चर झाले, तर रेश्मा यांच्या कपाळाला गंभीर इजा झाली. चालक उमेश मुळे आणि उपेंद्र गवळी यांना किरकोळ दुखापत झाली.

महामार्गावर अवजड वाहने पार्किंग लाईट न लावता तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करून रस्त्याच्या कडेला उभी केली जात असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत. विशेषतः जुना ओझर जकात नाका ते ट्रक टर्मिनल या दरम्यान महामार्गाच्या कडेला उभे असलेले ट्रक अपघातांना निमंत्रण देत असल्याचे चित्र आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक शहर कार्यक्षेत्रात 13 जानेवारीपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी

या प्रकरणी संबंधित ट्रकचालकाविरुद्ध आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास हवालदार बहिरम करत आहेत. (गुन्हा नोंद क्रमांक: ४३५/२०२५)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790