
नाशिक। दि. २७ डिसेंबर २०२५: नाशिक शहरातील इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने कवठेकरवाडी–पांडवलेणी परिसरात धडक कारवाई करत सहा बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे.
या महिलांकडे भारत सरकारचे बनावट आधारकार्ड व पॅनकार्ड आढळून आले असून, मोबाईल तपासणीत त्यांच्या बांगलादेशी नागरिकत्वाचे ‘गव्हर्नमेंट ऑफ पीपल्स रिपब्लिक ऑफ बांगलादेश’चे नॅशनल आयडी कार्डही सापडले आहे.
दि. २६ डिसेंबर रोजी इंदिरानगर पोलीस ठाण्याचे डीबी पथक पेट्रोलिंग करत असताना पोलीस उपनिरीक्षक संतोष फुंदे यांना खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली की कवठेकरवाडी, पांडवलेणी परिसरात काही बांगलादेशी महिला बेकायदेशीररीत्या वास्तव्यास आहेत.
ही माहिती प्रभारी अधिकारी मनोहर कारंडे व सहायक पोलीस निरीक्षक सुनील अंकोलीकर यांना कळविण्यात आली. माहितीची खात्री झाल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार डीबी पथकाने सापळा रचून कारवाई केली.
ताब्यात घेतलेल्या महिलांमध्ये शिल्पी मोहम्मद शुकरअली अकथेर उर्फ शिल्पी अकथेर (२५), सौम्या संतोष नायक उर्फ सुलताना सब्बीर शेख (२८), मुनिया खातून उर्फ पिंकी (२९), सोन्या कबीरुल मंडल उर्फ सोन्या रौफिक शेख (२७), मुक्ता जोलील शेख (३५) व शामोली बेगम उर्फ शामोली सुमसुर खान (४१) यांचा समावेश आहे. सर्व महिला मूळच्या बांगलादेशातील विविध जिल्ह्यांतील असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
चौकशीत या महिलांना नाशिकमध्ये वास्तव्य करण्यासाठी बॉबी आणि लकी उर्फ लियाकत हमीद कुरेशी (रा. नाशिक) या दोघांनी मदत केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४५९/२०२५ नुसार संबंधित दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास इंदिरानगर पोलीस ठाण्याचे अधिकारी करत असून, बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या व बेकायदेशीर वास्तव्याला मदत करणाऱ्या रॅकेटचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
![]()

