
नाशिक, दि. २७ डिसेंबर २०२५: सिडको परिसरातील राधेगार्डनमध्ये गावठी पिस्टल घेऊन नागरिकांमध्ये दहशत माजवणाऱ्या तरुणाला अंबड पोलिसांनी थरारक कारवाईत अटक केली आहे. वेदांत सुनिल सोनवणे (रा. सिडको) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून एक पिस्टल व दोन जिवंत काडतुसे असा सुमारे ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस शिपाई संदीप भुरे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, राधेगार्डन, उदय कॉलनी येथे वेदांत सोनवणे हा गावठी कट्टा/पिस्टल घेऊन परिसरात फिरत नागरिकांना शिवीगाळ करत धमक्या देत आहे. पायी चालणाऱ्या नागरिकांना पिस्टलचा धाक दाखविल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक नागरिक सैरावैरा पळून गेल्याचेही समोर आले होते. आरोपी गार्डनमध्ये लपून बसल्याने संपूर्ण परिसरात शुकशुकाट पसरल्याची माहिती मिळताच ही बाब वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत (अंबड पोलीस ठाणे) यांना कळविण्यात आली.
वरिष्ठांच्या आदेशानुसार सहायक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर, पोलीस शिपाई समाधान शिंदे, संजय सपकाळे, गांगुर्डे, सागर जाधव आदींच्या पथकाने डी.बी. मोबाईल वाहनातून घटनास्थळी धाव घेत सापळा रचला. पोलिसांनी वेदांत सोनवणे याला राधेगार्डन परिसरातून ताब्यात घेत त्याच्याकडून पिस्टल व दोन जिवंत काडतुसे जप्त केली.
या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात वेदांत सोनवणे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासात वेदांतला शस्त्र पुरविणारा सागर हेमंत सोनार याचाही शोध घेऊन त्यालाही अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वेदांत सोनवणे याच्याविरोधात अंबड पोलीस ठाण्यात यापूर्वी गंभीर स्वरूपाचे एकूण सहा गुन्हे दाखल आहेत, तर सागर सोनार याच्याविरोधात दोन गुन्ह्यांची नोंद आहे. या कारवाईमुळे सिडको परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
![]()

