नाशिक: पुरातत्व विभागाने प्राचीन मंदिरांच्या संवर्धनाचे काम वेळेत पूर्ण करावे – डॉ. प्रवीण गेडाम

नाशिक। दि. २५ डिसेंबर २०२५: नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्यासाठी देश विदेशातील कोट्यावधी भाविक येतील. कुंभमेळ्यातील अमृत स्नानाबरोबरच ते नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील प्राचीन मंदिरांना भेट देतील. त्यामुळे राज्य पुरातत्व विभागाने त्यांच्याकडील मंदिर संवर्धनाचे काम नियोजित वेळेत पूर्ण होईल, अशी दक्षता घ्यावी, असे निर्देश विभागीय आयुक्त तथा नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज दुपारी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणातर्फे विविध विषयांवर चर्चेसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, नाशिक वनवृत्तचे मुख्य वनसंरक्षक जी. मल्लीकार्जुन, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपवनसरंक्षक सिध्देश सावर्डेकर, राकेश सेपट, भारतीय पुरातत्व विभागाच्या छत्रपती संभाजी नगर मंडळाचे अधीक्षक शिवकुमार भगत (दूरदृष्यप्रणालीद्वारे), जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, लेखा व कोषागारे विभागाचे सह संचालक बी. डी. पाटील, पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, राज्य पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक अमोल गोटे, त्र्यंबकेश्वर नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहूल पाटील यांचेसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: धोकादायकरीत्या उभ्या ट्रकला कारची धडक; तीन वर्षांच्या चिमुकलीसह चौघे जखमी

अध्यक्ष डॉ. गेडाम म्हणाले की, कुंभमेळा कालावधीत नाशिकचे धार्मिकतेबरोबरच ऐतिहासिक व पर्यटनाच्यादृष्टीने ब्रॅण्डींग होणे आवश्यक आहेत. याकरीता शहर व परिसरातील सर्व पुरातन मंदिरे, धार्मिक, ऐतिहासिक व पर्यटनस्थळांचाही विकास होणे आवश्यक आहे. याकरीता याठिकाणी अधिक चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहेत. याकरीता सर्व संबंधित विभागांनी भाविक व पर्यटकांना आकर्षित करेल अशी विकासकामे नियोजनपूर्वक करावीत. प्राचीन मंदिरांच्या परिसरात त्यांचे महत्व विशद करणारे माहितीफलक उभारावेत. प्राचीन मंदिरांच्या ठिकाणी पौराणिक संदर्भाच्या अनुषंगाने सुशोभीकरणाचे नियोजन करण्याच्याही सुचना त्यांनी यावेळी दिल्यात.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: शिक्षकांकडून मागितली दोन लाखांची लाच; उपशिक्षणाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल !

पुरातत्व विभागाकडून कामांचा आढावा:
यावेळी राज्य पुरातत्व विभागामार्फत रामकुंड व शहर परिसरातील स्वामीनारायण मंदिर, नारोशंकर मंदिर, अजगरेश्वर बाबा समाधी, काशी विश्वेश्वर मंदिर, एकमुखी दत्त मंदिर ते बालाजी कोट, सांडव्यावरची देवी मंदिर आदिंचे संवर्धनाचे सुरु असलेल्या कामांचा तसेच त्र्यंबकेश्वर येथील प्रयागतीर्थ, गौतमेश्वर मंदिर, संगमतीर्थ, जुने कुशावर्त, इंद्रकुंड, मुकुंदतीर्थ, दर्शनपथ आदि ठिकाणी करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा घेण्यात आला. या कामांचे सादरीकरण श्री. गोटे यांनी केले. तर वन विभागामार्फत ब्रम्हगिरी व अंजनेरी पर्वत येथे करण्यात येणाऱ्या कामांची माहिती उपवनसंरक्षक श्री सावर्डेकर यांनी दिली. त्याचबरोबर भविष्यात पहिणे, दुगारवाडी, हरिहरगड, कावनई येथे करावयाच्या कामांबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790