नाशिक। दि. २३ डिसेंबर २०२५: नाशिक त्र्यंबकेश्वर येथे आगामी काळात होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या नाशिक परिक्रमा मार्गासह इतर रस्त्यांच्या कामात सर्व संबंधित विभागांनी समन्वय राखत गती देतानाच हा मार्ग सिंहस्थ कुंभमेळापूर्वी कार्यान्वित होईल, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज दुपारी नाशिक परिक्रमा मार्गासह इतर रस्ते कामांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे प्रकल्प संचालक ब्रिजेश दीक्षित, उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर, राकेश सेपट, उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ (भूसंपादन), सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते, तर दिंडोरीचे उपविभागीय अधिकारी अप्पासाहेब शिंदे हे दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले की, नाशिक परिक्रमा मार्ग शासनाचा महत्वकांक्षी उपक्रम आहे. या प्रकल्पामुळे नाशिक परिसर विकासाला चालना मिळणार आहे. या प्रकल्पाचे काम कुंभमेळ्यापूर्वी होणे आवश्यक आहे. या मार्गाच्या प्रस्तावित मोजणीसह आवश्यक कामांसाठी मनुष्यबळ आणि अद्ययावत यंत्रसामग्री उपलब्ध करून घ्यावी. त्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. या प्रकल्पासह इतर रस्ते कामांचे भूसंपादन व मोजणीचे सूक्ष्म नियोजन करून चिन्हांकनाचे काम तातडीने पूर्ण करावे. एकीकडे जमीन मोजणीची कार्यवाही सुरू असताना दुसरीकडे भूसंपादन विभागाने कृषी, वन विभाग यांचेशी समन्वय साधून आपली कार्यवाही सुरू करावी. जेणेकरून भूसंपादनाच्या प्रक्रियेला गती मिळून कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी मदत होऊ शकेल.
या मार्गासाठी भूसंपादनाच्या मोबदल्यात नियमाप्रमाणे भरीव भरपाई देण्यात येईल. त्यामुळे अधिकाऱ्यांनी त्या परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना राज्य शासनाची भूमिका समजवून सांगावी, असेही आवाहन जिल्हाधिकारी प्रसाद यांनी केले.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे प्रकल्प संचालक दीक्षित यांनी नाशिक परिक्रमा मार्गाच्या पूर्णत्वासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची यावेळी माहिती दिली.
![]()

