नाशिक | दि. २३ डिसेंबर २०२५: गुजरातमधील एका फॅमिली कारचा वापर करून बनावट क्रमांक लावून राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या मद्याची तस्करी करणारा प्रकार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने उघडकीस आणला आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दलपतपूर शिवारात सापळा रचून संशयास्पद कार अडविण्यात आली असून, त्यातून अवैध मद्याच्या बाटल्यांनी भरलेले ७३ खोके जप्त करण्यात आले. या प्रकरणी कारचालक मयुरभाई पटेल (वय ३३, रा. सिंदाई, वाझदा) याला अटक करण्यात आली आहे.
गुजरात, दीव-दमण व दादरा-नगर हवेली या भागांतून जिल्ह्यात होणारी मद्यतस्करी रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने सापळा कारवायांना गती दिली आहे. त्यानुसार निरीक्षक एन. एच. गोसावी व दुय्यम निरीक्षक आर. एन. सोनार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ठाणापाडा–हरसूल रस्त्यावर नाकाबंदी केली. दलपतपूर शिवारात संशयास्पद कार (एम.एच. १५ जी.आर. ५३२०) थांबवून चालकाची चौकशी करण्यात आली असता तो समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही.
कारची झडती घेतली असता, दमण, दीव व दादरा-नगर हवेली येथेच विक्रीस परवानगी असलेल्या मद्याच्या बाटल्यांनी भरलेले ७३ खोके लपवून ठेवलेले आढळून आले. या कारवाईत मद्यसाठ्यासह वाहन असा एकूण सुमारे १४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तीन राज्यांच्या बनावट नंबरप्लेट्स जप्त
तपासादरम्यान कारमध्ये महाराष्ट्र, गुजरात तसेच दीव-दमण येथील आरटीओ पासिंगचे बनावट क्रमांक असलेल्या तीन नंबरप्लेट्स (जी.जे. १५ सीडी ३७२६, डी.एन. ०९ एई २९०६, एम.एच. १५ डीएस ९३९४) आढळून आल्या. महाराष्ट्र हद्दीत नाशिकची, गुजरातमध्ये गुजरातची व दीव-दमण भागात संबंधित प्रदेशाची नंबरप्लेट लावून संशयित कार चालवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे.
![]()

