
नाशिक। दि. २२ डिसेंबर २०२५: आगामी काळात नाशिक, त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. यानिमित्त देश-विदेशातील कोट्यावधी भाविक जिल्ह्यात येतील. या भाविकांसाठी पायाभूत सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी आवश्यक तेवढ्याच शेतजमिनीचे संपादन करण्यात येईल. त्यातून जिल्ह्याचा विकासाला चालना मिळेल. शेत जमीन संपादित करताना कुणावरही अन्याय होवू नये यासाठी राज्य शासनाची भूमिका सकारात्मक राहील, अशी ग्वाही अन्न व औषध प्रशासन व विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज दुपारी मंत्री झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील दिंडोरी, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या तालुक्यात विविध प्रकल्पांसाठी संपादित होणाऱ्या जमिनीबाबत शेतकऱ्यांसमवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार हिरामण खोसकर, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
मंत्री झिरवाळ म्हणाले की, राज्य शासन शेतजमिनीचे भूसंपादन करताना कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही. त्यांना योग्य तो देय मोबदला देण्यासाठी प्रयत्न केले जातील. याबाबत शेतकऱ्यांना अद्ययावत माहिती जिल्हा प्रशासनाने द्यावी. त्यामुळे शेतकऱ्यांनी भूसंपादनासाठी सकारात्मक भूमिका घेऊन जिल्ह्याच्या विकास प्रक्रियेत सहभागी व्हावे, असेही आवाहन त्यांनी केले. आमदार खोसकर यांनी विविध महत्वपूर्ण सूचना केल्या.
जिल्हाधिकारी प्रसाद म्हणाले की, कुंभमेळ्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. यामुळे दळणवळणाच्या सुविधा वाढून जिल्ह्याच्या विकासाची द्वारे खुली होणार आहेत. नियमांच्या चौकटीत राहून शेतकऱ्यांना अधिकचा मोबदला मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. शेतकऱ्यांनी मूल्यवर्धित सेवांना प्राधान्य देतानाच रोजगार निर्मिती होईल, अशा उद्योगांना प्राधान्य द्यावे, असेही सांगितले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी मनोगत व्यक्त केले.
![]()

