राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या महापालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल 16 जानेवारी रोजी लागणार आहे. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. राज्यातील 29 महापालिकांसाठी 3 कोटी 48 लाख मतदार मतदान करणार आहेत.
राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका या गेल्या पाच ते सात वर्षांपासून किंवा त्या पेक्षा जास्त कालावधीपासून प्रलंबित होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. त्यामध्ये सुरुवातीला 2 डिसेंबर रोजी नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका घेण्यात आल्या. आता त्यानंतर राज्यातील प्रलंबित 29 महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला.
Municipal Corporations Election Schedule : महापालिकेच्या निवडणुकीचे वेळापत्रक
- नामनिर्देशन पत्र स्वीकारणे – 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर
- अर्जाची छाननी – 31 डिसेंबर
- उमेदवारी माघारीची मुदत – 2 जानेवारी
- चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी – 3 जानेवारी
- मतदान – 15 जानेवारी
- निकाल – 16 जानेवारी
राज्यातील 27 महापालिकांची मुदत संपली आहे. त्यासोबत जालना आणि इचलकरंजी या दोन नवीन महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या महापालिका निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 रोजीची मतदान यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे. ही यादी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आली असल्याने त्यामध्ये नावे वगळण्याचे अधिकार राज्य आयोगाला नाहीत असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
मतदार जनजागृतीसाठी रील तयार करण्यात आले आहेत. जेष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी मतदार केंद्रावर आवश्यक त्या सुविधा असतील. मतदान केंद्रावर रँप आणि व्हील चेअर असतील.
राज्यातील 1,96, 605 कर्मचारी या निवडणुकीसाठी काम करतील. मतदानाच्या आधी 48 तास प्रचारावर बंदी असेल. तसेच त्या दरम्यान जाहिरातींवरही बंदी असेल. महापालिका निवडणूक नियमांनुसार ही बंदी असेल.
राज्यातील 29 महापालिकांच्या एकूण 2,869 जागांसाठी मतदान होणार आहे. त्यामध्ये 1,442 महिला सदस्य, 759 इतर मागासवर्गीय सदस्य, 341 अनुसूचित जाती तर 77 सदस्य हे अनुसूचित जमातीचे सदस्य असतील.
![]()

