नाशिक। दि. १५ डिसेंबर २०२५: लिस्टेड शेअर ब्रोकिंग कंपनीचा अधिकृत प्रतिनिधी असल्याचे भासवत बलातील जवानासह इतर २५ गुंतवणूकदारांची तब्बल २.९१ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी संशयित ब्रोकर ओमप्रकाश यादव याच्याविरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी नाशिकरोड रेल्वे स्थानक येथे रेल्वे सुरक्षा बलात कार्यरत असलेल्या अस्लम शाह (रा. नाशिकरोड) यांनी तक्रार नोंदवली आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये यादवने स्वतःला नामांकित, लिस्टेड शेअर ब्रोकिंग कंपनीचा अधिकृत एजंट असल्याचे सांगत शाह यांचा विश्वास संपादन केला. खडकपाडा, कल्याण येथे ऑनलाइन ट्रेडिंगचे कार्यालय असल्याचे सांगून गुंतवणुकीस प्रवृत्त केले.
शेअर बाजारातील गुंतवणुकीवर दरमहा ६ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून शाह यांच्यासह इतर २५ गुंतवणूकदारांकडून मोठी रक्कम उकळण्यात आली. मात्र, वर्षभराचा कालावधी उलटूनही न परतावा मिळाला, न गुंतवणूक केलेली रक्कम परत देण्यात आली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधितांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास नाशिकरोड पोलीस करीत आहेत.
![]()

