नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप
नाशिक। दि. १३ डिसेंबर २०२५: समता नागरी पतसंस्था, कोपरगावचे चेअरमन काका कोयटे यांनी आपली फसवणूक केल्याचा गंभीर आरोप उद्योजक डॉ. संजय चंद्रकांत मोरे यांनी केला आहे. आपल्याला प्रत्यक्षात कोणतेही कर्ज दिले नसताना चार कोटी रुपयांचे सीसी कर्ज कागदोपत्री दाखवून थकीत कर्जदार ठरवले जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
मोरे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, पतसंस्थेने वर्ग-२ शेतजमीन नियमबाह्यरीत्या तारण ठेवून व्यवहार केले. २०१६-१७ मध्ये संबंधित शेतजमीन त्यांच्या नावे विक्री दाखवण्यात आली; मात्र प्रत्यक्षात कोणताही मोबदला मिळालेला नाही. उलट, कागदोपत्री दाखवलेले सीसी कर्ज त्यांच्या खात्यात वर्ग करून तीच रक्कम चेअरमनच्या नातेवाईकांच्या खात्यात जमीन खरेदी म्हणून वळवण्यात आल्याचा आरोप आहे.
वर्ग-२ शेतजमीन असल्याने ती त्यांच्या नावावर होऊ शकत नसतानाही तारण ठेवून कर्ज दाखवण्यात आले. कंपनी विस्तारासाठी आवश्यक असलेले कर्ज न मिळाल्याने त्यांच्या कंपन्या सुरू होऊ शकल्या नाहीत, असा दावा मोरे यांनी केला. या प्रकरणात बनावट कागदपत्रे, नियमबाह्य तारण व आर्थिक फसवणूक झाल्याचा उल्लेख पतसंस्थेच्या लेखापरीक्षण अहवालातही असल्याचे त्यांनी सांगितले.
या संपूर्ण प्रकरणी चेअरमन काका कोयटे यांच्यावर कडक फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी डॉ. संजय मोरे यांनी केली आहे.
![]()

