
नाशिक। दि. ९ डिसेंबर २०२५: मार्केटिंग स्कीममध्ये गुंतवणूकदारांना १५ महिन्यांत ९,४०० रुपये भरण्यास सांगून एलईडी संच देण्याचे आमिष देत ९,७०० गुंतवणूकदारांना तब्बल ९ कोटींचा गंडा घालून ९ वर्ष फरार झालेल्या संशयिताला अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने घुलवाडी, संगमनेर येथे ही कारवाई केली. २०१७ मध्ये सरकारवाडा पोलिस ठाण्यात फसवणूक आणि एमपीआयडीकायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सारंग पानसरे (रा. घुलेवाडी) असे या संशयिताचे नाव आहे.
पथक फरार संशयित आरोपींचा शोध घेत असताना, सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, संजय सानप, मनोहर शिंदे, नंदकुमार नांदुर्डीकर आणि चंद्रकांत गवळी यांना माहिती मिळाली. फसवणुकीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या संशयिताचा घुलेवाडीपर्यंत मागोवा घेत त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत तो गुन्हा घडल्यापासून फरार असल्याचे सिद्ध झाले. संशयिताला आता आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले आहे.
नाशिक, जळगाव आणि धुळे जिल्ह्यांत २०१६ ते २०१७ या कालावधीत गायत्री मार्केटिंगच्या माध्यमातून लकी ड्रॉ योजनेद्वारे सभासदांना प्रति महिना २५ हजारांपासून ते १ लाखांपर्यंत बक्षीस देण्याचे आमिष देण्यात आले होते. त्यांनी ९,७०० सभासदांकडून ९ कोटी ११ लाख ८० हजार रुपयांची रक्कम गोळा केली होती. (सरकारवाडा पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ३९६/२०१७)
![]()

