नाशिक। दि. ७ डिसेंबर २०२५: सप्तश्रृंग गड (ता. कळवण) येथे आज सायंकाळी झालेल्या अपघातग्रस्तांना जिल्हा प्रशासन आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येत आहे. घटनास्थळी मदत कार्य सुरू आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी दिली.
सप्तश्रृंगी गड घाटात आज सायंकाळी कार (MH15BN0555) सुमारे 600 फूट दरीत कोसळून अपघात झाला. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून ते पिंपळगाव बसवंत येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली मदत कार्य सुरू आहे.
घटनास्थळी पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, उपविभागीय अधिकारी नरेश अकुनुरी, तहसीलदार रोहिदास वारुळे आदींसह वरिष्ठ अधिकारी दाखल झाले आहेत. जिल्हाधिकारी श्री. प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी श्री. राजपूत, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे हे स्थानिक पातळीवर मदत कार्य करणाऱ्या सर्व पथकाच्या संपर्कात आहेत.
![]()

