
नाशिक। दि. ७ डिसेंबर २०२५: भद्रकालीमध्ये छुप्या पद्धतीने मांजा विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच नायलॉन मांजा विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या रहेमान लतीफ खान याला भद्रकाली पोलिसांनी नाईकवाडीपुरा येथे ताब्यात घेतले.
त्याच्यावर पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून नायलॉन मांजाविक्रेत्यांवर तडीपारी कारवाई केली जात असल्याने भीतीपोटी भिवंडीतून आणलेला मांजा घरातच लपवून ठेवल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली.
पथकाने बनावट ग्राहकाला मांजा खरेदी करण्याकरता पाठवले. सुरुवातीला त्याने नकार दिला. मागाहून त्याने बोलावून घेत किती पाहिजे असे विचारले. ग्राहकाने मांजा खरेदी केल्यानंतर इशारा केला. पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्या नाईकवाडीपुरा येथील घरात मांजाचा साठा असल्याचे समजले. पथकाने घरातून ३१ हजार ५०० रुपये किमतीचे नायलॉन मांजाचे ४५ गट्टू जप्त केले.
मांजा विक्री करणाऱ्यांवर तडिपारी आणि पूर्वी गुन्हे दाखल असलेल्या कारवाईत मिळून आलेल्या विक्रेत्यावर आता एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली जाणार आहे. वापर करणाऱ्यांसह अल्पवयीन मुलांच्या पालकांवर गुन्हा दाखल केला जाणार आहे.
– किरणकुमार चव्हाण, उपायुक्त, गुन्हे
![]()

