नाशिक। दि. १० नोव्हेंबर २०२५: शहरात राहणाऱ्या एका इसमाला टेररिस्ट फंडिंग आणि मनी लॉन्डरिंग प्रकरणात अडकविण्याची भीती दाखवत सायबर भामट्यांनी तब्बल 66 लाख 50 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित व्यक्ती राहत्या घरी असताना त्यांच्या व्हॉट्सअॅपवरून एका अज्ञात क्रमांकावरून व्हिडिओ आणि व्हॉईस कॉलच्या माध्यमातून संपर्क करण्यात आला. स्वतःला मुंबई पोलिस विभागातून बोलत असल्याचा बनाव करत त्या व्यक्तीने पीडिताला “आपण टेररिस्ट फंडिंग आणि मनी लॉन्डरिंग प्रकरणात सामील आहात,” असा आरोप करत अटक करण्याची धमकी दिली.
तपासाच्या नावाखाली दबाव टाकत आरोपींनी पीडिताकडून अॅक्सिस बँक आणि बँक ऑफ बडोदा यांच्या विविध खात्यांमध्ये एकूण 66,47,142 रुपये हस्तांतरित करून घेतले. 25 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर या कालावधीत मोबाईल आणि इंटरनेटच्या माध्यमातून ही फसवणूक करण्यात आली.
या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात भामटे आणि ज्यांच्या खात्यांमध्ये पैसे वर्ग झाले आहेत अशा खातेधारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
![]()
