
नाशिक। दि. ८ नोव्हेंबर २०२५: नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणारा कुंभेमळा हा नाशिकसह महाराष्ट्राचे ब्रॅण्डिंग करण्याची मोठी संधी आहे. यामुळे आध्यात्मिक, धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटनाला चालना मिळून रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. याबरोबरच महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यास मदत होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक विभागाने सिंहस्थ कुंभपर्व यशस्वी होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे. कुंभमेळ्यानिमित्त सुरू झालेल्या विकास कामांना गती द्यावी, असे निर्देश राज्याचे मुख्य सचिव राजेशकुमार यांनी दिले.
विभागीय आयुक्त कार्यालय येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव गोविंदराज, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, गृह विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार (विशेष), विभागीय आयुक्त तथा नाशिक- त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम, विभागीय रेल्वे व्यवस्थापक (भुसावळ) पुनीत अग्रवाल, नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण आदी उपस्थित होते.
मुख्य सचिव राजेशकुमार म्हणाले, प्रयागराज येथील कुंभमेळा पाहता यावेळी नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची वाढती संख्या राहणार आहे. त्यासाठी गर्दीचे सूक्ष्म नियोजन करा. येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही यासाठी जवळपास असलेल्या मुलभूत सुविधांची माहिती ॲप, पोर्टल तसेच विविध डिजिटल माध्यमांद्वारे कुंभमेळ्यापूर्वीच त्यांच्यापर्यंत पोहोचवावी. भाविकांना पार्किंग स्थळापासून ते अमृत स्नान स्थळापर्यंत सुरक्षित पोहचण्यासाठी नियोजन करावे. त्यासाठी सर्व यंत्रणांचा एकमेकांशी समन्वय असणे अतिशय आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना महाराष्ट्राच्या कला, संस्कृतीची ओळख होईल, यासाठी पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या समन्वयाने प्राधिकरणाने कार्यक्रम या कालावधीत ठेवावेत. मागील सिंहस्थ कुंभमेळ्यात प्रत्यक्ष कामे केलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांची मदत या कुंभमेळासाठी घ्यावी. सूक्ष्म नियोजन, एकमेकांमध्ये समन्वय आणि अनुभवाची साथ तसेच सामाजिक संस्था आणि लोकसहभाग या बळावर हा सिंहस्थ कुंभमेळा भव्य दिव्य, यशस्वी आणि अपघात आणि आपत्ती विरहित करण्याचे शिवधनुष्य प्रत्येक यंत्रणेने उचलावे. स्वच्छ, सुंदर, हरित, पर्यावरणपूरक असा हा कुंभमेळा असेल याकडे लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
कुंभमेळा काळात पर्वणीच्या दिवशी आणि इतर कालावधीत पुरेसा बंदोबस्त असेल याचे पूर्वनियोजन आतापासूनच करावे. संभाव्य अडचणी आणि आपत्तीचा विचार करून आपत्ती व्यवस्थापन आराखडा अद्ययावत करावा. त्यासाठी आवश्यक साधनसामुग्री आणि मनुष्यबळ उपलब्ध करून ठेवावे, असे निर्देश श्री. राजेशकुमार यांनी दिले.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने प्रस्तावित विविध विकासकामे वेळेवर पूर्ण होतील, याची सर्व जबाबदारी संबंधित यंत्रणेवर असणार आहे. पायाभूत सुविधांची सर्व कामे मार्च २०२७ पूर्वी पूर्ण होतील, या पद्धतीने नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. विकास कामांसाठी असणाऱ्या भूसंपादन, रस्ते आदी कामे वेळेत पूर्ण होणे अत्यावश्यक आहेत. कोणत्याही परिस्थितीत कुंभमेळा कालावधीत अर्धवट कामे राहणार नाहीत, याची दक्षता संबंधित यंत्रणांनी घ्यावी, अशा स्पष्ट सूचनाही मुख्य सचिवांनी दिल्या.
यावेळी मुख्य सचिव श्री. राजेशकुमार यांनी पोलिस, महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, रेल्वे, आरोग्य, रस्ते विकास महामंडळ, जलसंपदा, महावितरण, नगरपालिका यासह विविध यंत्रणांच्या कामांचा आढावा घेतला. अपर प्रधान सचिव गोविंदराज, प्रधान सचिव एकनाथ डवले, प्रधान सचिव सौरभ विजय आदींनीही यावेळी उपयुक्त सूचना केल्या.
कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम आणि कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी सादरीकरणाद्वारे प्राधिकरणाच्या कामांचा आढावा सादर केला. तसेच विविध विभागामार्फत करण्यात येणारी कामे, सुरू असलेली कामे आदिंची माहिती संबंधित विभागप्रमुख यांनी यावेळी दिली.
![]()
