नाशिक। दि. ८ नोव्हेंबर २०२५: नाशिक शहरात आता थंडीची चाहूल जाणवू लागली आहे. शहराच्या वातावरणात आता बदल झाला असून, गुरुवारी शहराचे किमान तापमान १८.२ अंश होते. मात्र, केवळ दोनच दिवसात हे तापमान तब्बल पाच अंशांनी खाली आले आहे. आज (दि. ८) १३.४ अंश इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर निफाडला किमान १३. १ अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली.
या हंगामात प्रथमच पारा १५ अंशांच्या खाली घसरला. पुढील दोन ते तीन दिवसांपर्यंत रात्री आणि पहाटे थंडीचा जोर असाच कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्रात प्रवेश करत असल्याने तापमानात आणखी १ ते २ अंशांची घट होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
गेल्या आठवड्यांपासून ढगाळ वातावरणामुळे थंडी जाणवत नव्हती. मात्र, आता उत्तरेकडील जम्मू-काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी सुरु झाल्यामुळे, थंड वाऱ्याचा मोठा प्रवाह थेट येण्याची शक्यता आहे. जर राज्यात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले नाही, तर यंदा शहरात थंडीचा कडाका अधिक राहण्याची शक्यता आहे. शुक्रवारी थंडीची तीव्रता चांगलीच जाणवली.
![]()

