
नाशिक। दि. ३१ ऑक्टोबर २०२५: महावितरणच्या नाशिक परिमंडळाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या अनुकंपा तत्वावरील नियुक्ती प्रक्रियेअंतर्गत सेवेत असताना निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या अवलंबितांना आधार देण्यासाठी शासन नियमांनुसार सुरू असलेल्या या प्रक्रियेनुसार आज (दि. २९ ऑक्टोबर )रोजी अवलंबित उमेदवारांना विविध पदांवर विविध ठिकाणी रुजू होण्यासाठी नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. विद्युत भवन, नाशिक येथे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांच्या हस्ते आठ नवनियुक्त उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान करून ग्राहक सेवेसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
मुख्य अभियंता लटपटे यांनी या प्रसंगी सांगितले की, “महावितरण ही केवळ सेवा देणारी संस्था नसून आपल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदनशील जबाबदारी पार पाडणारी सामाजिक संस्था आहे. मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना शासन नियमानुसार अनुकंपा तत्वावर नोकरीत सामावून घेणे ही प्रक्रिया कंपनीच्या मूल्यव्यवस्थेचा अविभाज्य भाग आहे. नाशिक परिमंडळात ही प्रक्रिया पारदर्शक, गतिमान आणि संवेदनशील पद्धतीने पार पाडली जात आहे.”
नाशिक परिमंडळात मागील तीन महिन्यांत १२ अवलंबितांना विविध पदांवर नियुक्ती देण्यात आली असून, आज आणखी ८ वारस उमेदवारांना नोकरीची संधी मिळाली आहे. कर्मचाऱ्यांच्या देयके व वारसांच्या प्रकरणांची विलंब न होता सोडवणूक व्हावी, यासाठी परिमंडळ पातळीवर विशेष यंत्रणा उभारण्यात आली आहे. या अनुषंगाने नाशिक परिमंडळात अनुकंपा तत्वावरील नियुक्ती प्रक्रियेला गती मिळाली आहे.
सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) चंद्रकांत खाडे यांच्या नेतृत्वाखाली मानवी संसाधन विभागाने सातत्याने प्रयत्न करून प्रलंबित प्रकरणांची तत्काळ छाननी केली. तसेच पात्र उमेदवारांना शासन नियमांनुसार नियुक्ती देण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, समन्वय आणि प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्यात आली आहे.
नियुक्तीपत्र वितरण कार्यक्रमास वरिष्ठ व्यवस्थापक मुरलीधर गवळी, सहाय्यक विधी अधिकारी रणजीत बोम्मी, जनसंपर्क अधिकारी विकास आढे व उपव्यवस्थापक विजय कडाळे यांच्यासह नाशिक परिमंडळातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
![]()

