नाशिक। दि. 13 ऑक्टोबर 2025: दिवाळीत घरोघरी बालमित्रांसह तरूण व जेष्ठ मंडळी दुर्गांच्या प्रतिकृती साकारत असतात. या निमित्ताने शासनाच्या वतीने महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) ने दुर्गोत्सवाचे आयोजन केले आहे. नागरीकांनी आपल्या अंगणात, बाल्कनीत, सोसायटीच्या सार्वजनिक जागेत 12 दुर्गांपैकी एक प्रतिकृती बनवून https://durgotsav.com/ या संकेस्तळावर सेल्फीसह पाठवावे. असे आवाहन अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी केले आहे. अशी माहिती अमृत नाशिक विभागाचे विभागीय व्यवस्थापक मंगेश खाडीलकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
रायगडृ राजगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग, साल्हेरदुर्ग, खांदेरीचा दुर्ग, जिंजी, पन्हाळगड, शिवनेरी, विजयदुर्ग, लोहगड, पद्मदुर्ग(सुवर्णदुर्ग) या बारा दुर्गांपैकी कोणतीही एक प्रतिकृती दुर्गोत्सवासाठी साकारावी. गडदुर्गाचा आकार कमीतकमी दोन फुट किंवा त्यापेक्षा जास्त असावा. सेल्फी काढतांना तो गडदुर्गाचा अधिक भाग दिसेल असा असावा.
दुर्गोत्सवात सहभागी होणाऱ्या सर्व छायाचित्रांचे संकलन केले जाणार असून या उपक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येकास मुख्यमंत्री महोदयांच्या स्वाक्षरीने अभिनंदन पत्र पाठविण्यात येणार आहे. यासह ‘अमृत’ ने निर्माण केलेल्या अमृत विद्या या डिजिटल लर्निंग प्लॅट फॉर्मवरील शिवछत्रपतींचा गौरवशाली इतिहास व त्यातून घ्यावयाचे धडे या विषयावरील 199 रूपयांचे प्रशिक्षण निशुल्क उपलब्ध होणार आहे. यात स्वराज्यरक्षक दुर्ग, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्वाच्या घटना, कवी भूषण यांची कवने, स्वराज्यासाठी लढलेल्या स्वराज्ययोद्यांच्या परिचयाची श्रृंखला या सर्व गोष्टींचा अस्वाद सहभागी होणाऱ्या व्यक्तींना मिळणार आहे.
![]()

