नाशिक | दि. ३० सप्टेंबर २०२५: सिडको परिसरातील दत्त चौकात प्राणघातक हत्यार घेऊन फिरणाऱ्या इसमाला खंडणी विरोधी पथकाने वेळीच पकडत संभाव्य मोठा अनर्थ टाळला. या कारवाईत पोलिसांनी आरोपीकडून धारदार चॉपर जप्त केला आहे.
गंगापूर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार गौरव खांडरे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, संशयित राष्ट्रपाल विठ्ठल भगत (वय ३३, रा. हनुमान मंदिराजवळ, मटाले चौक, कामठवाडे, सिडको, नाशिक) हा प्राणघातक हत्यार घेऊन दत्त चौक परिसरात फिरत आहे. ही माहिती त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांना दिली. राजपूत यांनी तत्काळ खंडणी विरोधी पथकाला कारवाईसाठी पाचारण केले.
पथकाने सापळा रचून दुपारी १६.२३ वाजता भगत याला ताब्यात घेतले. अंगझडतीदरम्यान त्याच्याकडून धारदार चॉपर सापडला. चौकशीत त्याने कबुली दिली की, एका व्यक्तीसोबत आर्थिक व्यवहार झाले असून त्याने पैसे परत न दिल्यामुळे तो त्याला मारण्यासाठी चॉपर घेऊन फिरत होता.
खंडणी विरोधी पथकाने प्रसंगावधान दाखवून आरोपीला अटक केल्याने संभाव्य जीवितहानी टळली. या प्रकरणी अंबड पोलीस स्टेशनमध्ये भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदिप मिटके, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपुत, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे, महिला सहायक पोलीस उपनिरीक्षक मंगला जगताप, हवालदार योगेश चव्हाण, दत्तात्रय चकोर, पोलीस नाईक: मंगेश जगझाप, भुषण सोनवणे, अंमलदार चारूदत्त निकम, गौरव खांडरे व महिला अंमलदार सविता कदम यांच्या पथकाने केली.
![]()

