मुंबई। दि. १ ऑक्टोबर २०२५: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील बोगस लाभार्थी शोधण्यासाठी मागील काही दिवसांपासून राज्य सरकारने लाभार्थ्यांची पडताळणी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात मतदारांना आकर्षित करण्यासाठी या योजनेचे निकषांकडे फार लक्ष दिलं नव्हतं.
मात्र, आता राज्य सरकारच्या तिजोरीवर आर्थिक भार येत असल्यामुळे या निकषांची कठोर अंमलबजावणी करत लाखो महिलांचा लाभ बंद करण्यात आला आहे. अशातच आता आता राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी आणखी एक नियम लागू केला आहे.
ज्यामुळे या योजनेतील महिला लाभार्थ्यांची संख्या आणखी कमी होण्याची शक्यता आहे. कारण शासनाकडून या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांसोबतच त्यांचे पती किंवा वडिलांची ई केवायसी करणं बंधनकारक केलं आहे.
नव्या नियमांनुसार लाभार्थी महिलेचे पती किंवा वडिलांचे वार्षिक उत्पन्न किती आहे, याची पडताळणी केली जाणार आहे. लाभार्थी महिलेचं लग्न झालं असेल तर पतीचं आणि लग्न झालं नसेल तर वडिलांचे उत्पन्न तपासले जाणार आहे. या तपासणीत वडील किंवा पतीचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असल्यास संबंधित महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार आहे.
तर आता महायुती सरकारने लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचे एकूण उत्पन्न शोधण्यासाठी पती किंवा वडिलांची ई केवायसी देखील बंधनकारक केली आहे. त्यामुळे आता राज्य सरकार अनेक जाचक अटी या योजनेच्या पडताळणीसाठी घालत असल्याचा आरोप काही लाभार्थी महिलांकडून केला जात आहे.
अशी करा प्रक्रिया पूर्ण:
सरकारचे या योजनेसाठी स्वतंत्र संकेतस्थळ ladakibahin.maharashtra.gov.in आहे. यावर अथवा ई महासेवा केंद्रावर महिलांना ईकेवायसी पूर्ण करता येणार.
साईटवर जा. ई-केवायसीवर क्लिक करा.
नाव, पत्ता, रेशन कार्ड क्रमांक, उत्पन्नाची माहिती आणि आधार क्रमांक नोंदवा.
मागितलेली कागदपत्रं अपलोड करा. सबमिट करा. त्यानंतर कागदपत्रं जमा झाल्याची खात्री करा.
पती/वडिलांचे तपशील आणि घोषणापत्र
- लाभार्थी पात्र असल्यास तिला पुढील टप्प्यातील ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. यात पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल.
- यानंतर संमती दर्शवून OTP टाकून Submit करावे. त्यानंतर लाभार्थ्याला आपला जात प्रवर्ग निवडावा लागेल आणि खालील गोष्टी प्रमाणित (Declaration) कराव्या लागतील.
- माझ्या कुटुंबातील सदस्य शासकीय विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत नियमित/कायम कर्मचारी म्हणून कार्यरत नाहीत किंवा निवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत.
- माझ्या कुटुंबातील केवळ 1 विवाहित आणि 1 अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे.
- या बाबी प्रमाणित करून Submit बटण दाबल्यानंतर “Success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.
![]()

