नाशिक। दि. ३० सप्टेंबर २०२५: जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय नाशिक च्या अधिपत्याखालील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व शासकीय तांत्रिक विद्यालय या संस्थांमध्ये अल्पमुदतीचे व्यवसाय अभ्यासक्रम राबविले जाणार आहेत. हे अभ्यासक्रम 8 ऑक्टोबर 2025 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन होवून सुरू होणार आहेत. या प्रशिक्षणाचा स्थानिक युवा, गृहिणी व विद्यार्थी यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आय.एम.काकड यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या संस्था व्यवस्थापन समितीद्वारे हे अभ्यासक्रम निवडले व राबविले जाणार असून याचा स्थानिक युवक, गृहिणी, विद्यार्थी यांच्यासोबतच उद्योग-व्यापार क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे. या अभ्यासक्रमांची माहिती व नाव नोंदणीची सुविधा www.msbsvet.edu.in या संकेतस्थळावर उपलबध करून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये उद्योग व सेवा क्षेत्रास कुशल मनुष्यबळ पुरविण्याचे काम केले जाते. या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये वर्गखोल्या, यंत्रसामुग्री, प्रशिक्षक इत्यादी पायभूत सुविधा उपलब्ध आहेत. सुरू करण्यात येणाऱ्या अल्पकालीन अभ्यासक्रमांमुळे स्वयंरोजगारासाठी आवश्यक असणारे मार्गदर्शन देखील युवांना प्राप्त होणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
![]()

