पोलीस आयुक्त कार्यालयात आढावा बैठक संपन्न
नाशिक। दि. २९ सप्टेंबर २०२५: पोलीस प्रशासनावर नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. आगामी सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीला आळा घालणे आणि कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्याच्या दृष्टीने पोलस विभागाने अधिक दक्ष रहावे, अशा सूचना शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिल्या.
पोलीस आयुक्त कार्यालयात आज नाशिक शहरातील कायदा व सुव्यवस्था बळकट करण्यासाठी, गुन्हेगारी रोखणे, वाहतूक नियंत्रण आणि नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही होण्यासाठी अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी बैठकीस पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, पोलीस उपायुक्त किशोर काळे, पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहाय्यक पोलीस आयुक्त संदिप मिटके यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
मंत्री दादा भुसे म्हणाले की, नाशिक शहर शांत व सुरक्षित शहर असावे, हीच नागरिकांची अपेक्षा आहे. यादृष्टीने अल्पवयीन मुलांकडून घडत असलेल्या गुन्ह्याच्या घटना लक्षात घेता शहरात कॉम्बिंग ऑपरेशन राबवावे. यासह रात्रीची गस्त वाढविण्यात यावी. शाळा व महाविद्यालय परिसरातही विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपायायोजना कराव्यात. अल्पवयीन गुन्हेगारी संदर्भात राज्यस्तरावरून कायद्यात काय बदल केला जाऊ शकतो हा मुद्दा देखील शासनाच्या विचाराधीन असल्याचे मंत्री भुसे यांनी यावेळी सांगितले.
शहरात ठिकठिकाणी होणारी वाहतुकीच्या कोंडी कमी होण्याच्या दृष्टीने वाहतुकीचे योग्य नियोजन करण्याच्या सूचनाही शिक्षणमंत्री भुसे यांनी बैठकीत दिल्या.यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पोलीस आयुक्तालयामार्फत आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्याच्यादृष्टीने केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
![]()

