नाशिक। दि. २५ सप्टेंबर २०२५: तपोवन परिसरातील गोदावरी कपिल संगम भागातील कोठुळे मळ्यात गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या विनापरवाना गॅस सिलिंडर रिफिल करणाऱ्या अड्ड्यावर आडगाव पोलिसांनी कारवाई केली आहे.
घरगुती, तसेच व्यावसायिक वापराचे ५१ गॅस सिलिंडर, दोन मालवाहू रिक्षा आणि इलेक्ट्रिक मोटार असा जवळपास सव्वा दोन लाख रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे. या ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरमधील गॅस व्यावसायिक सिलेंडरमध्ये अवैधरित्या भरण्याचा उद्योग सुरु होता. गॅस रिफिलिंग करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याची खातजमा करत पोलिसांनी ही कारवाई केली.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. संशयित कृष्णा विठ्ठल चव्हाण, ईश्वर सखाराम घोडे, तसेच भगवान शिवाजी कोठुळे या तिघांवर गुन्हा दाखल केला असून, यातील घोडे व कोठुळे या दोघांवर यापूर्वी आडगाव, तसेच गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. (पंचवटी पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ३०९/२०२५)
![]()

