जिल्ह्यात उद्दिष्टाच्या 72 टक्के खरीप पीक कर्जाचे वितरण
नाशिक, दि. २५ सप्टेंबर २०२५ (जिल्हा माहिती कार्यालय): शेतकऱ्यांच्या पीक कर्ज प्रकरणांसह बँकांनी प्रलंबित असलेली कर्ज प्रकरणे वेळेत निकाली काढावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात जिल्ह्यातील बँकाच्या तिमाही आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्री शर्मा बोलत होते.
या बैठकीस जिल्हा कृषी अधिकारी रवींद्र माने, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, रिझर्व बँक ऑफ इंडियाचे उप महाप्रबंधक भूषण लघाटे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक भिवा लवटे यांच्यासह सर्व अधिकारी, महामंडळाचे प्रतिनिधी, बँक प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. शर्मा म्हणाले की, शेतकऱ्यांनी वेळेत कर्ज भरून पीक कर्ज व्याजमाफी योजनेचा लाभ घ्यावा. मुख्यमंत्री रोजगार योजना, पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, महिला बचत गट तसेच इतर महामंडळांची प्रकरणे वेळेत मंजूर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
बैठकीत विविध कर्जप्रकरणांबाबत चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात जून 2025 अखेर रूपये 52 हजार 603 कोटी उद्दिष्टापैकी रूपये 18 हजार 922 पूर्णाक 35 कोटी म्हणतेच 35.97 टक्के कर्जाचे वाटप झाले आहे. यात प्रामुख्याने खरीप पीक कर्जाच्या रूपये 3 हजार 166 पूर्णाक 40 कोटी उद्दिष्टापैकी रूपये 2 हजार 306 पूर्णाक 25 कोटी म्हणजेच उद्दिष्टाच्या 72.80 टक्के वाटप झाले आहे . तसेच सूक्ष्म, लघु, माध्यम उद्योगासाठी रूपये 17 हजार 200 कोटी उद्दिष्टापैकी 8 हजार 173 पूर्णाक 25 कोटी कर्ज वाटप करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री. लवटे यांनी बैठकीत दिली.
![]()

