नाशिक/मुंबई, दि. २३ सप्टेंबर २०२५: महावितरणच्या लघुदाब वर्गवारीतील सर्व औद्योगिक, व्यावसायिक, घरगुती व इतर ग्राहकांच्या १५७ केडब्लूपर्यंत वीज भार वाढीच्या ऑनलाइन अर्जांना महावितरणकडून स्वयंचलित पद्धतीने मंजुरी देण्यास प्रारंभ झाला आहे. महावितरणच्या संकेतस्थळावर ही स्वयंचलित प्रणाली कार्यान्वित झाली आहे. त्यामुळे पायाभूत यंत्रणा उभारण्याची गरज नाही अशा ठिकाणी ग्राहकांनी नियमानुसार शुल्काचा भरणा केल्यानंतर केवळ २४ ते ४८ तासांमध्ये मागणीप्रमाणे वाढीव वीजभार स्वयंचलित पद्धतीने मंजूर व कार्यान्वित होणार आहे.
राज्याचे मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीजग्राहकांना ‘इज ऑफ लिव्हिंग’नुसार (राहणीमान सुलभता) सेवा देण्याची सूचना केली आहे. त्यानुसार महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी लघुदाब वर्गवारीतील सर्व ग्राहकांसाठी वीज भारात वाढ किंवा कमी करण्याची प्रक्रिया ऑनलाइनद्वारे स्वयंचलित करण्याचे निर्देश दिले. त्यासाठी ऑनलाइन प्रणाली विकसीत करून दि. १७ सप्टेंबर ते दि. २ ऑक्टोबरच्या सेवा पर्वाचे औचित्य साधून ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.
सध्या अस्तित्त्वात असलेल्या जोडणीच्या वीजभारामध्ये करारापेक्षा आणखी वाढ करणे किंवा कमी करण्याची सोय महावितरणच्या www.mahadiscom.in संकेतस्थळावर किंवा मोबाइल अॅपवर ग्राहकांना स्वतःच्या लॉगीनद्वारे उपलब्ध आहे. मात्र मंजूरीची प्रक्रिया स्वयंचलित नसल्याने पुढील कार्यवाहीसाठी बराच वेळ लागत होता. आता १५७ किलोवॅटपर्यंतच्या वीज भाराच्या वाढीसाठी स्वयंचलित मंजूरी देण्यात येणार आहे. वीज भार वाढीबाबत ऑनलाइन मागणी नोंदविल्यानतंर संबंधित ग्राहकांना स्वयंचलित पद्धतीने कोटेशन देण्यात येईल. तर कोटेशनचे शुल्क भरण्याची देखील ऑनलाइन सोय आहे.
लघुदाब वर्गवारीमध्ये शून्य ते ७.५ किलोवॅट, ७.५ ते २० किलोवॅट आणि २० ते १५७ किलोवॅट असे वीजभाराचे तीन गट आहेत. या तिनही गटात वीज भार वाढीच्या मंजूरीसाठी स्वयंचलित प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. ग्राहकांना केवळ संकेतस्थळ किंवा मोबाईल अॅपद्वारे ऑनलाइन अर्ज करावा लागेल व नियमानुसार शुल्क भऱावे लागेल. त्यापुढील सर्व प्रक्रिया महावितरणकडून स्वयंचलित पद्धतीने होणार आहे. त्याची माहिती संबंधित ग्राहकांना नोंदणीकृत मोबाईल क्रमांक किंवा ई-मेलद्वारे कळविण्यात येणार आहे.
वीजग्राहकांनी आवश्यक शुल्काचा भरणा केल्यानंतर नवीन मीटर बसविण्याची किंवा पायाभूत वीजयंत्रणा उभारण्याची गरज नसेल अशा नसेल, अशा वीजजोडणीचा वाढीव वीज भार स्वयंचलित प्रणालीने मंजूर होईल व केवळ २४ तासांत कार्यान्वित होईल. वाढीव वीजभाराच्या आवश्यकतेनुसार किंवा सिंगलऐवजी थ्री फेजची मागणी असल्यास नवीन मीटर लावण्यात येते. अशा ठिकाणी नवीन वीज मीटर लावण्याचा आदेश स्वयंचलितपणे संबंधित एजन्सीला देण्यात येईल. त्यामुळे नवीन वीजमीटरची आवश्यकता असलेल्या ठिकाणी देखील साधारणतः ४८ तासांमध्ये वीज भार वाढीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
यासह ज्या वीजजोडणीचा करारापेक्षा अधिक वीज भार वाढविण्यासाठी पायाभूत यंत्रणा उभारण्याची आवश्यकता आहे, त्याठिकाणी महावितरणद्वारे पायाभूत यंत्रणा उभारण्यात येईल. त्याबाबत स्वयंचलितपणे निवडसूचीवरील संबंधित एजन्सीला कळविण्यात येईल. पायाभूत यंत्रणा उभारण्याचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात येईल. या प्रक्रियेची माहिती वेळोवेळी संबंधित ग्राहकांना कळविण्यात येईल.
लघुदाब वर्गवारीमध्ये वीज भार वाढीच्या ऑनलाइन अर्जांना स्वयंचलित पद्धतीने मंजूरी देण्याच्या निर्णयामुळे महावितरणच्या ग्राहकसेवेचा नवा अध्याय सुरू झाला आहे. त्याचा प्रामुख्याने प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेसाठी घरगुती ग्राहकांना तसेच प्रामुख्याने औद्योगिक, व्यावसायिक व इतर लघुदाब ग्राहकांना मोठा लाभ होणार आहे.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790