पुणे। दि. २३ सप्टेंबर २०२५: राज्यात सध्या काही भागांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबई, पुणे, बीड, धाराशिव तसेच नाशिक आणि आसपासच्या भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. या आठवडाभरात राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला. तर शुक्रवारनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. राज्यभरात पावसाने कहर केला आहे, संपूर्ण मराठवाडा पाण्याखाली गेला असून मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचं नुकसान झालं आहे. अशातच आणखी एक आठवडा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
बंगालच्या उपसागरामध्ये सध्या कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून परिणामी राज्यात पुढील तीन दिवसांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, राज्यात दि. २६ ते २८ सप्टेंबर यादरम्यान काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी दिली. मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाने धुमाकूळ घातल्याने पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज:
बंगालच्या उपसागरावर तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र विरलं असलं, तरी त्याचा परिणाम अजूनही काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या स्वरूपात जाणवत आहे. दरम्यान, येत्या बुधवारी (दि. २४) पुन्हा एक नवीन कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे २६ ते २८ सप्टेंबरदरम्यान राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाचे सानप यांनी वर्तवला आहे. मॉन्सून पुन्हा एकदा सक्रिय होत असल्यामुळे त्याच्या परतीच्या प्रवासाबाबत सध्या अंदाज बांधता येत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
मात्र, हे कमी दाबाचं क्षेत्र विरल्यानंतर मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता असल्याचं त्यांनी नमूद केलं.लदरम्यान, मॉन्सूनने सोमवारी गुजरात, राजस्थान, हरियाणा व पंजाबच्या काही भागांमधून परतला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार मंगळवारी (दि. २३) कोकण, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुढील दोन ते दिवसांत राज्यात बहुतांश जिल्ह्यांत मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790