नाशिक। दि. २१ सप्टेंबर २०२५: नाशिक शहरातील पंचवटी परिसरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या सागर जाधव गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई करत पंचवटी पोलिसांनी भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटील यांना अटक केली आहे.
सराईत गुन्हेगारांसोबत बैठक आणि गोळीबाराचा कट रचण्यात स्पष्ट सहभाग असल्याचे उघड झाल्याने पंचवटी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. विशेष म्हणजे मंत्री गिरीश महाजन हे नाशिकमध्ये असतानाच जगदीश पाटील यांना अटक झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
काही दिवसांपूर्वी पंचवटीतील फुलेनगर परिसरात सागर जाधव या युवकावर गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्यात सागर जाधव गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक तपासात या हल्ल्यामागे पूर्ववैमनस्य आणि टोळीयुद्ध असल्याचे उघड झाले आहे.
काही दिवसांपूर्वीच उद्धव निमसेंनाही बेड्या:
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच भाजपचे आणखी एक माजी नगरसेवक उद्धव निमसेंना राहुल धोत्रे हत्याकांडप्रकरणी अटक करण्यात आली होती. आता सलग दुसऱ्यांदा भाजपच्या माजी नगरसेवकांवर झालेल्या पोलीस कारवाईमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
![]()

