नाशिक। दि. २० सप्टेंबर २०२५: त्र्यंबकेश्वर येथे वृत्तांकनासाठी जात असतांना स्वामी समर्थ केंद्राजवळ असलेल्या पार्किंग जवळील वसुली करणाऱ्या गुंडांनी पत्रकारांना जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. यात इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे तीन पत्रकार जखमी झाले आहे. गंभीर जखमींना अपोलो रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून या घटनेचा पत्रकारांनी जाहीर निषेध व्यक्त करत गुंडांवर कारवाईची मागणी केली आहे.
पत्रकार किरण ताजणे यांच्यासह इतर पत्रकार हे वृत्तांकनासाठी जात असतांना काही ठेकेदारांच्या ‘वसुलीभाई’ गुंडांकडून त्यांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीच्या घटनेत पत्रकार किरण ताजणे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारार्थ नाशिक येथील खासगी रूग्णालयात हलविण्यात आले आहे.
याठिकाणी प्रवेशासाठी या गुंडांमार्फत दुचाकी आणि चारचाकीकडून अनधिकृतपणे वसुली केली जात होती. या प्रकाराला विरोध केल्यानंतर गुंडानी पत्रकारांना मारहाण केली. हा वसुलीचा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी सुरु आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. इतक्या दिवसांपासून सुरु असलेली ही वसुली आणि गुंडगिरी ग्रामीण पोलिसांच्या निर्दशनास येऊ नये याबाबत साशंकता वाटते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी तातडीने धाव घेत पत्रकार किरण ताजणे यांची भेट घेतली. तसेच या गुंडांवर तातडीने कारवाई करून त्यांचा बंदोबस्त करण्याचे आदेश भुजबळ यांनी पोलीस अधीक्षक यांना दिले आहेत. याप्रकरणी पत्रकार योगेश खरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार प्रशांत सोनवणे, शिवराज आहेर आणि ऋषिकेश गांगुर्डे यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पत्रकारांनी सांगितली आपबीती:
याबाबत ज्येष्ठ पत्रकार योगेश खरे यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले की, ‘त्रंब्यकेश्वरमध्ये प्रवेश करण्यासाठी काही फी आकारली जाते. ही फी पर्यटकांकडून वसूल केली जाते. या वसूलीसाठी काही मुले ठेवली आहेत. आम्ही साधू महंतांची एक बैठक कव्हर करण्यासाठी जात असताना या ही घटना घडली. आम्ही पत्रकार आहोत आम्ही बैठक कव्हर करायला चाललो आहोत असे सांगून सुद्धा, आमच्या गाड्या बाजूला घ्यायला लावल्या. तुम्ही पत्रकार असो वा कोणीही असो तुमच्या गाड्या सोडणार नाही. इथे यायचे नाही असे मुलांनी सांगितले. त्यानंतर प्रचंड गोंधळ उडाला आणि आमच्यावर हल्ला करण्यात आला. एका पत्रकाराला दगडाने मारहाण करण्यात आली. त्यानंतर तिथे असलेल्या मुलांनी अजून काही मुले जमा केली. त्यानंतर सर्व पत्रकारांना मारहाण करण्यात आली.
![]()

