नाशिक। दि. १५ सप्टेंबर २०२५: यंदा नाशिक शहरासह जिल्ह्यात मान्सून समाधानकारक ठरला असून, आता त्याच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. या दरम्यान पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. शनिवारी आणि रविवारी (दि. १४) शहराच्या दक्षिण व पूर्व उपनगरांसह ग्रामीण भागात हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या.
हवामान विभागाने शनिवारपासून गुरुवारपर्यंत (दि. १८) नाशिक जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. या कालावधीत विजांचा कडकडाट, मध्यम स्वरूपाचा पाऊस तसेच ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वाहणारे वारे अनुभवायला मिळू शकतात, असा इशारा देण्यात आला आहे.
शनिवारीपासून शहरात ढगाळ वातावरण असून, पहाटे ते सकाळपर्यंत काही भागात आणि दुपारनंतर सायंकाळपर्यंत मध्यवस्तीमध्ये सरी कोसळत आहेत. पंचवटी, म्हसरुळ व मखमलाबाद परिसरात मात्र तुलनेने तुरळक पाऊस झाला.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीदरम्यान ३.१ किमी उंचीवर चक्रीय वारे निर्माण झाले असून, त्याचा परिणाम नाशिकसह महाराष्ट्रातील काही भागांवर दिसून येत आहे.
![]()

