नाशिक महानगरपालिकेकडून साडेतीन लाख थकबाकीदारांना नोटिसा

नाशिक | दि. ९ सप्टेंबर २०२५ : शहरातील तब्बल ३ लाख ६० हजारांहून अधिक घरपट्टी थकबाकीदारांना नाशिक महानगरपालिकेकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ५०० रुपयांपासून ते लाखोंच्या थकबाकीपर्यंतची रक्कम अद्याप न भरलेल्या मिळकतधारकांनी तातडीने कर भरून सहकार्य करावे, असे आवाहन मनपाने केले आहे.

महानगरपालिकेच्या नोंदीनुसार, सध्या थकबाकीदारांकडे ३४७ कोटी रुपयांचा दंड थकलेला आहे. २०१३ पासून थकबाकी न भरल्यास शास्तीची तरतूद करण्यात आली असून, कर वेळेत न भरल्यास मासिक दोन टक्क्यांपर्यंत अतिरिक्त शास्ती आकारली जाते. त्यानंतर नोटीस, जप्ती आणि लिलावाची कारवाई केली जाते; मात्र लिलाव प्रक्रियेला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने महसूल वसुलीत अडचणी निर्माण होत आहेत.

⚡ हे ही वाचा:  नाशिक महापालिकेची अतिक्रमणाविरुद्ध मोहीम आजपासून पुन्हा सुरू...

करदात्यांसाठी अभय योजना:
थकबाकीदारांना दिलासा मिळावा आणि महसूलवाढ साध्य व्हावी यासाठी मनपाने यंदाही अभय योजना लागू केली आहे. १ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या योजनेत ३१ ऑक्टोबरपर्यंत करदात्यांना शास्तीच्या रकमेत ९५ टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात शास्तीवर ८५ टक्के सवलत दिली जाणार आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: सातपूर गोळीबारातील फरार शुभम निकम अखेर गजाआड

योजनेला नागरिकांचा प्रतिसाद मिळू लागला असून, पहिल्याच आठवड्यात २,६८५ करदात्यांनी कर आणि दंड मिळून १ कोटी ८१ लाख रुपयांचा भरणा केला आहे. यातून ६७ लाखांचा दंड करदात्यांना माफ झाला आहे.

सिंहस्थ व विकास निधीचा विचार:
आगामी सिंहस्थ कुंभमेळा, पंधराव्या वित्त आयोगाचा निधी तसेच विकासकामांसाठी लागणारा खर्च लक्षात घेता महापालिकेने ‘जम्बो सवलत योजना’ही लागू केली आहे. यात थकबाकीदारांनी एकरकमी कर भरल्यास दंडात मोठ्या प्रमाणावर सूट मिळणार आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिकमध्ये जोरदार पावसाची हजेरी; तीन तासांत १०.४ मिमी पावसाची नोंद, आज (दि. २६) यलो अलर्ट कायम

थकबाकीदारांनी मनपाच्या या योजनेचा लाभ घेत तातडीने कर भरणा करून शहराच्या विकासाला हातभार लावावा, असे आवाहन महापालिकेच्या कर विभागाचे उपायुक्त अजित निकत यांनी केले आहे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here