मुंबई। दि. ५ सप्टेंबर २०२५: राज्यात आज पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकण, घाटमाथा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय मराठवाड्यातही काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर विदर्भात ढगाळ वातावरण राहील, असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. ज्या भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, त्या भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज पालघर, ठाणे, रायगड, नंदुरबार, नाशिक आणि पुणे जिल्ह्यांच्या घाटमाथ्यांवर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, नाशिक, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर देखील जोरदार सरींचा अंदाज आहे.
मराठवाड्यातील काही भागातही विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, परभणी, नांदेड आदी जिल्ह्यांतील येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भात मात्र बहुतांश भागात ढगाळ वातावरण राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
ज्या भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, त्या भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे. दरम्यान, राज्यातील काही भागात काल पावसाने हजेरी लावली. गेल्या २४ तासांत विदर्भात काही भागांत तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या.
![]()

