नाशिक, दि. 3 सप्टेंबर, 2025 (जिमाका वृत्तसेवा): कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना राबविल्या जातात. या योजनांची अंमलबजावणी करतांना वेळ व श्रम वाचविण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी बैठकीत दिल्या.
आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात कृषी विभागाच्या विविध योजनांचा आढावा जिल्हाधिकारी शर्मा यांनी घेतला. यावेळी विभागीय कृषी सह संचालक सुभाष काटकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने, आत्मा चे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशिद यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले की, आज सर्व क्षेत्रात ए.आय. प्रणालीचा वापर प्रभावीपणे होतांना दिसून येतो. दैनंदिन काम करतांना कालानुरूप चालत आलेल्या कार्यपद्धतीत बदल करून आपण निश्चितच या प्रणालीचा वापर करून कामाचा निपटरा वेळेत करू शकतो. कांद्याची साठवणूक करण्यासाठी शेतकऱ्यांना कांदाचाळीसाठी अनुदान दिले जाते. कांदा अधिक काळ टिकावा यासाठी कांदाचाळ तयार करण्यात वापरण्यात येणाऱ्या पारंपारीक साधनांमध्ये बदल करून सुरक्षित पद्धतीच्या साधनांच्या निर्मितीसाठी डिझाइन तयार करण्यात यावे. पीकपहाणी व पीक नोंदणी करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग करावा व शेतकऱ्यांना या साधानांच्या वापरासाठी कार्यशाळा आयोजित करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी शर्मा यांनी दिल्या.
महानगरपालिका क्षेत्रात शेतकरी ते ग्राहक विक्री केंद्र सुरू करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेतर्फे जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कृषी विभागाने ही विक्री केद्रे स्थापन करण्यासाठी किमान 10 ठिकाणी जागांची निश्चिती करावी. या केंद्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणार असून त्यांच्या शेतीमालाला रास्त भाव मिळणार आहे. या ठिकाणी स्वच्छता राहील याची कटाक्षाने दक्षता घ्यावी. यासोबतच कृषी विभागाने योजनांचे प्रस्ताव वेळेत सादर करावेत, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी दिल्या.
यावेळी कृषी समृद्धी योजना, राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान, प्रधानमंत्री पीक विमा योजना, महावेध प्रकल्प, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, राष्ट्रीय कृषी विकास योजना, मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना, अटल भूजल योजना, कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम, राष्टीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान, राष्ट्रीय खाद्यतेल अभियान, पिकांवरील किड रोग सर्व्हेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) अशा विविध योजनांचा आढावा जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी घेतला. यावेळी कृषी सह संचालक सुभाष काटकर यांनी कृषी विभागांतर्गत सुरू असलेल्या योजनांची माहिती सादर केली.
![]()

