पंचवटी-म्हसरूळ परिसरात घरफोड्या करणारा सराईत आरोपी जेरबंद; १३ लाखांचा मुद्देमाल जप्त

पंचवटी व म्हसरूळ हद्दीत १० घरफोड्या करणारा सराईत आरोपी फारूक रज्जाक काकर याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून ११ तोळे सोने, व १ किलो चांदी असा जवळपास १३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

नाशिक | दि. २ सप्टेंबर २०२५: पंचवटी व म्हसरूळ परिसरात सलग घरफोड्या करणाऱ्या सराईत चोरट्याला पोलिसांनी शिताफीने अटक केली असून, त्याच्याकडून तब्बल १३ लाख ६ हजार ७५४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. जप्त केलेल्या मालामध्ये ११ तोळे सोने आणि १ किलो ५२ ग्रॅम चांदीचा समावेश आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: भरधाव मोटारसायकलच्या धडकेत २४ वर्षीय युवतीचा मृत्यू

घरफोड्यांची मालिका उलगडली:
२३ ऑगस्ट रोजी पंचवटीतील मखमलाबाद रोडवरील राधानगर ड्रिम कॅसलच्या मागे असलेल्या कल्पेश पार्क येथील एका फ्लॅटमध्ये झालेल्या घरफोडीच्या घटनेवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर गुन्हे शोध पथकाने पंचवटी हद्दीत सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. आरोपीची हालचाल, गुन्हा करण्याची पद्धत व वेळ यांचा बारकाईने अभ्यास करून पोलिसांनी संशयिताचा मागोवा घेतला.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सतिश शिरसाठ यांनी दोन टिम तयार करून संशयिताच्या हालचालीवर लक्ष ठेवले. २३ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट २०२५ दरम्यान पंचवटीतील मखमलाबाद रोड, गणेशनगर, ड्रिम कॅसल परिसरासह अमृतधाम, औदुंबरनगर भागात रात्री गस्त घालण्यात आली.

⚡ हे ही वाचा:  मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू; नाशिक जिल्ह्यात गुरुवारपर्यंत ‘यलो अलर्ट’

आरोपी जेरबंद:
रात्री ११.३० वाजता पोलीस हवालदार कैलास शिंदे, अमोल काळे, सचिन बाहिकर, वैभव परदेशी, अंकुश काळे व नितीन पवार यांच्या पथकाने संशयित इसमाला पकडले. चौकशीत त्याने आपले नाव फारूक रज्जाक काकर (वय ४८, रा. लोहारी बुद्रुक, ता. पाचोरा, जि. जळगाव) असे सांगितले. अंगझडतीदरम्यान त्याच्याकडून घरफोडीचे साहित्य व चोरीचा मुद्देमाल मिळून आला.

१० घरफोड्यांची कबुली:
पोलीस कस्टडीत सखोल चौकशी केल्यानंतर आरोपीने पंचवटी व म्हसरूळ हद्दीत केलेल्या तब्बल १० घरफोड्यांची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला आहे.

⚡ हे ही वाचा:  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाने दिली ‘ही’ शेवटची तारीख !

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त (परिमंडळ -१) मोनिका राऊत आणि सहायक पोलीस आयुक्त (पंचवटी विभाग) श्रीमती संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलीस ठाण्याच्या पथकाने केली. पंचवटी पोलिसांच्या या कारवाईमुळे गेल्या काही दिवसांपासून नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती कमी होण्याची शक्यता असून, या यशस्वी मोहिमेसाठी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here