नाशिक। दि. ३१ ऑगस्ट २०२५: त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरिहर गडावर ट्रेकिंगसाठी आलेल्या भंडारा जिल्ह्यातील १९ जणांच्या ग्रुपमधील आशिष समरीत (२९, रा. खुमारी, ता. माटोरा, जि. भंडारा) हा गड उतरत असताना पाय घसरून शंभर फूट खोल दरीत कोसळला. यात त्याच्या डोक्यासह हात पायाला गंभीर दुखापत झाली. दरम्यान, त्याला तातडीने उपजिल्हा रुग्णालय, त्र्यंबकेश्वर येथे नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
भंडारा जिल्ह्यातील खुमारी (ता. माटोरा) येथील १९ जणांचा ग्रुप शनिवारी (दि. ३०) सकाळी त्र्यंबकेश्वरच्या ट्रेकिंगसाठी हरिहर गडावर आला होता. सकाळी चढाईला सुरुवात करून ११ वाजेच्या सुमारास ते सर्वजण शिखरावर पोहोचले. त्यानंतर ११.४५ वाजता उतरण्यास सुरुवात केली. दाट धुके आणि पावसामुळे निसरड्या झालेल्या वाटेवरून आशिषचा पाय घसला आणि तो थेट शंभर फूट खोल दरीत कोसळला.
पोलिस उपनिरीक्षक सुभाष गिते हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले व गंभीर जखमी आशिषला उपजिल्हा रुग्णालयात आणले. डॉ. गणेश शिंदे यांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
![]()

