कुणालाही शुल्क देऊ नये; महावितरणचे आवाहन
नाशिक, दि. २९ ऑगस्ट २०२५: स्मार्ट मीटर असलेल्या घरगुती ग्राहकांना टीओडीप्रमाणे वीज दरात सवलत मिळत असून महावितरणकडून एजन्सीच्या माध्यमातून हे स्मार्ट टीओडी मीटर ग्राहकांकडे मोफत लावण्यात येत आहेत. सोबतच रूफ टॉप सोलर उभारणाऱ्या ग्राहकांना आवश्यक असणारे नेट मीटर सुद्धा मोफत लावण्यात येत आहेत.
त्यामुळे टीओडी आणि नेट मीटर ग्राहकांकडे लावताना एजन्सी वा त्यांच्या कर्मचाऱ्यांनी सदर मीटरसाठी कुठल्याही शुल्काची मागणी केल्यास, न देता नजीकच्या महावितरण कार्यालयात संपर्क करावा वा तक्रार करावी असे आवाहन महावितरणने केले आहे
महावितरणकडून स्मार्ट टीओडी मीटर ग्राहकांकडे मोफत लावण्यात येत आहे. त्यामुळे या नव्या मीटरचा कोणताही आर्थिक भुर्दंड ग्राहकांवर नाही. घरगुती ग्राहकांकडे टीओडी मीटर असल्याशिवाय त्यांना दिवसाच्या वीज दरात असलेल्या सवलतीचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे सदर टीओडी मीटर आणि रूफ टॉप सोलर उभारणाऱ्या ग्राहकांना आवश्यक असणाऱ्या नेट मीटर लावण्यासाठी कुणाकडूनही शुल्काची मागणी झाल्यास देऊ नये. यासंदर्भात ग्राहकांनी नजीकच्या महावितरण कार्यालयात तक्रार करावी असे आवाहन महावितरणने केले आहे.